संबंधित परिसरात आचारसंहिता लागू : सर्वण, वेळी ग्रामपंचायती पोटनिवडणूक,आयुक्त डब्ल्यू. रमणमूर्ती यांची घोषणा
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील उर्वरित पाच पालिकांची निवडणूक आणि सर्वण कारापूर (प्रभाग 2) व वेळ्ळी (प्रभाग 4) या ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक शुक्रवार दि. 23 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा निवडणूक आयुक्त डब्ल्यू. रमणमूर्ती यांनी केली.
पणजीत राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात काल मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत रमणमूर्ती बोलत होते. त्यावेळी आयोगाचे सचिव मेल्वीन वाझ, ओएसडी डॉ. दुर्गाप्रसाद, ओएसडी आशुतोष आपटे व सहसंचालक सागर गुरव हे अधिकारी उपस्थित होते.
आरक्षण, पुनर्रचना प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
प्रभाग आरक्षण व पुनर्रचनेच्या मुद्यावरून खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे उत्तर गोव्यातील म्हापसा आणि दक्षिण गोव्यातील मडगाव, मुरगाव, सांगे व केपे या पाच पालिकांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्या स्थगितीला सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता खंडपीठाचा निर्णय उचलून धरण्यात आला होता. तसेच 30 एप्रिलपूर्वी पाच पालिकांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
त्यानुसार निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर दि. 23 एप्रिल ही तारीख निवडणुकीसाठी निश्चित केली आणि त्यासंबंधी काल दि. 30 मार्च रोजी घोषणा केली. त्या क्षणापासून संबंधित पालिका व ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असल्याचे रमणमूर्ती यांनी जाहीर केले.
पाचही पालिका मिळून 1,85,225 मतदार
एकूण 20 प्रभागांच्या म्हापसा पालिकेत 16403 पुरुष व 17080 महिला मिळून 33483 मतदार आहेत. 25 प्रभागांच्या मुरगाव पालिकेत 34602 पुरुष व 33487 महिला मिळून 68089 मतदार आहेत. 25 प्रभागांच्या मडगाव पालिकेत 32255 पुरुष व 34158 महिला मिळून 66413 मतदार आहेत. 10 प्रभागांच्या सांगे पालिकेत 2532 पुरुष व 2811 महिला मिळून 5343 मतदार आहेत. 13 प्रभागांच्या केपे पालिकेत 5727 पुरुष व 6170 महिला मिळून 11897 मतदार आहेत. वरील पाचही पालिकांचे एकूण 93 प्रभाग असून मतदारसंख्या 185225 एवढी आहे. त्यासाठी एकूण 124 ठिकाणी 230 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
सर्वण, वेळ्ळी पंचायतीत पोटनिवडणूक
उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील सर्वण कारापूर ग्रामपंचायत प्रभाग 2 साठी 627 तर दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील वेळ्ळी पंचायतीच्या प्रभाग 4 साठी 372 मतदार हक्क बजावणार आहेत.
राज्यात लागू करण्यात आलेली आचारसंहिता ही संबंधित पालिका व ग्रामपंचायत परिसरापुरतीच मर्यादित राहणार आहे. मुरगाव पालिका क्षेत्रातील 18 प्रभाग संवेदनशील जाहीर करण्यात आले आहेत.
पालिका व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची प्रक्रिया खालीलप्रमाणे
- उमेदवारी अर्ज स्वीकारणे दि. 31 मार्च ते 8 एप्रिल, सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत (सार्वजनिक सुट्टय़ा वगळून)
- अर्जांची छाननी 9 एप्रिल
- अर्ज मागे घेणे 10 एप्रिल, सकाळी 10 ते दु. 3 वा. पर्यंत
दु. 3 नंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर - मतदानाचा दिवस 23 एप्रिल, सकाळी 8 ते सायं. 5 पर्यंत
कोरोना रुग्णांसाठी (सायं. 4 ते 5) एक तास राखीव - मतमोजणी 26 एप्रिल, सकाळी 8 वाजल्यापासून