प्रतिनिधी / बांदा:
पाडलोस-केणीवाडा येथे वस्तीलगत असलेल्या काजू बागायतीत मृत माकड आढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाडलोस ग्रामपंचायतीला याची कल्पना देण्यात आली. परंतु उशिरापर्यंत संबंधित विभागाचा कुणीही कर्मचारी घटनास्थळी दाखल न झाल्याने शेतकरी सुनील परब यांनी सदर मृत माकडाची विल्हेवाट लावली.
बांदा परिसरात यावर्षी दोन माकडतापाचे रुग्ण आळढले आहेत. कोरोनाबरोबर माकडतापाचीही भीती बागायतदारांसमोर निर्माण झाली आहे. पाडलोस-केणीवाडा येथील आंबा बागायतदार सुनील दशरथ परब (रा.न्हावेली-रेवटेवाडी) हे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बागेत फेरफटका मारताना त्यांना मृतावस्थेत एक माकड दिसून आला. त्यांनी याची माहिती ग्रामस्थ अमोल नाईक यांना दिली. तसेच पाडलोस सरपंच यांनाही कळविले. परंतु उशिरापर्यंत संबंधित विभागाचा कोणताही कर्मचारी न आल्याने सुनील परब यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या मृत माकडाची विल्हेवाट लावली.