जिल्हा कोविड रुग्णालयातील परिचरिकांशी चर्चा
प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठक – पालकमंत्री
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी शनिवारी आंदोलन छेडताच पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिचारिकांशी संवाद साधत समन्वय घडवून आणला. आरोग्य कर्मचाऱयांवरील ताण कमी करण्यासाठी नवीन मनुष्यबळ वाढविले जाईल. त्याचबरोबर सद्यस्थितीत काम करणाऱया परिचारिकांच्या कायम नियुक्तीबाबत लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, संदेश पारकर आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात डॉ. अपर्णा गावकर यांच्याकडून होणाऱया त्रासाला कंटाळून परिचारिकांनी शनिवारी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयाला भेट देत परिचारिकांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांना आणून मार्ग काढू, असे सांगून आंदोलन थांबवले होते. त्यानंतर आमदार नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. सामंत यांनी रविवारी जिल्हा रुग्णालयाला भेट देत बैठकही घेतली. त्यांनी परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली.
यावेळी परिचारिकांनी समस्यांचा पाढाच वाचला. वरिष्ठांकडून होणाऱया त्रासाकडेही लक्ष वेधले. त्यानंतर यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेतून समन्वय साधण्यात आला. खासदार राऊत यांनी आरोग्य आणि वित्तमंत्र्यांशी चर्चा करून परिचारिकांच्या नियुक्तीबाबत बैठक लावावी, अशी सूचना केली. पालकमंत्री सामंत यांनी परिचारिकांना योग्य सोयीसुविधा तात्काळ रुग्णालय प्रशासनाने पुरवाव्यात. त्यांच्या शासनस्तरावरील मागण्यांबाबत लवकरच बैठक लावण्यात येईल. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. कामाचा ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची भरती करण्यास सुरुवात करावी, अशा सूचना दिल्या.
कोविडसाठी बेड वाढविण्याच्या सूचना
पालकमंत्री सामंत यांनी कोरोना प्रतिबंधक आणि उपाययोजनांबाबतही आढावा घेतला. जिल्हय़ात कोविड रुग्णांसाठी वाढीव बेडची सुविधा करावी. मिशन ऑक्सिजन अंतर्गत जिल्हय़ात ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट उभे करण्यासाठी संबंधित कंपन्यांशी करार करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी आयुष रुग्णालयाच्या सुरू असणाऱया बांधकामाची पाहणी करत अभियंत्यांना सूचना केल्या.
वीजपुरवठा सुरू करा!
पालकमंत्र्यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने महावितरणची आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, प्रकाशगड येथून अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन नुकसानग्रस्त भागातील वीज जोडण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. या कामात स्थानिक ग्रामस्थांचेही चांगले सहकार्य मिळत आहे, हे कौतुकास्पद आहे. महावितरणने उर्वरित 26 हजार ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. खासदार राऊत यांनीही यावेळी आवश्यक असणारी साधनसामुग्री घेण्याबाबत सूचना केली.
यावेळी मुख्य अभियंता किशोर परदेशी, अधीक्षक अभियंता इक्बाल मुलाणी, अधीक्षक अभियंता विनोद पाटील, उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार उपस्थित होते.