प्रतिनिधी/ बेळगाव
शैक्षणिक विकास ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण देत असताना विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे पालक आहेत. यामुळे ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया होम स्कूलिंग प्रमाणेच हाताळावी लागत आहे. मोठय़ा वर्गातील मुलांना शिक्षकांनी शिकविलेली प्रक्रिया आत्मसात होत असल्या तरी छोटय़ा वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या मार्गदर्शनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. ऑगस्टमध्ये ऑनलाईन शिक्षणाला मिळालेला हिरवा कंदील आणि नियमावली यानुसार शाळा रोजच सुरू आहे. मात्र सुटीच्या निर्णयामुळे विद्यार्थी-शिक्षकांबरोबरच पालकांनादेखील सुटी मिळाली आहे.
दसरा सुटी 30 आक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे रोजचे व्हिडिओ डाऊनलोड करणे, लिंक ओपन करणे, घटक समजून घेणे, पाल्याला दाखविणे आणि होमवर्क करवून घेणे या कामात व्यस्त असलेल्या पालकांनाही सुटी मिळाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे शिक्षकांबरोबरच पालकांचे कामही वाढले. पाल्याला शाळेत पाठविल्यानंतर पालकांची जबाबदारी पार पाडली जाते. मात्र, घरातच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण निर्माण करून देणे आणि नियोजित वेळापत्रकाप्रमाणे मार्गदर्शन करणे यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. मात्र, सध्या सुटी असल्याने पालकरुपातील शिक्षकांनादेखील सुटी मिळाली आहे.
अध्यापन प्रक्रिया पार पाडताना शिकवणीपासून प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक, तोंडी, लेखी अभ्यास तसेच नियोजनानुसार परीक्षा ही शैक्षणिक कामे विद्यार्थ्यांकडून करवून घेताना पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अधिक वेळ द्यावा लागत आहे. यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. कोरोनाचा धोका ओळखत क्लास अथवा इतर कोणत्या संस्थांचा आधार घेता येत नसल्याने पाल्याची शैक्षणिक प्रगती पालकांवरच आहे. यामुळे सध्या मिळालेली दसरा सुटी विद्यार्थ्यांच्या सुटीबरोबरच पालकांनादेखील सुटी मिळाली आहे.