अकरा पालिका व पणजी मनपाचाही समावेश : कोरोना संसर्ग-लसीकरणामुळे निर्णय सर्व प्रशासकांना मुदतवाढ
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील 11 पालिका व पणजी महापालिकेच्या 28 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुका कोविडचे कारण दर्शवून पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार घेतला आहे. याबाबत अधिसूचना जारी केली असून पालिका प्रशासकांना 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे तर पणजी महापालिकेची मुदत 11 मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर तिथेही प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. महापालिका अस्तित्वात आल्यापासून प्रथमच त्यावर प्रशासक नियुक्त करण्याची पाळी सरकारवर येणार आहे.
एका महत्त्वपूर्ण निर्णयाद्वारे राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने डिचोली, कुंकळ्ळी, कुडचडे – काकोडा, काणकोण, म्हापसा, मडगाव, मुरगाव, पेडणे, केपे, सांगे आणि वाळपई या 11 नगरपालिकांच्या निवडणुका एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.
एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या पालिका निवडणुका
या सर्व पालिकांच्या निवडणुका 18 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्याचा निर्णय या अगोदर घेतला होता. या सर्व पालिकांची मुदत 4 नोव्हेंबर 2020 रोजी संपुष्टात येत होती. मात्र निवडणूक प्रक्रिया शक्य होणार नसल्याचे कारण दर्शवून पालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. त्यांची मुदत 18 जानेवारी 2021 रोजी म्हणजेच काल सोमवारी संपुष्टात आली. प्रशासकांची मुदत संपण्याअगोदर निवडणुका होणे आवश्यक होते परंतु राज्य सरकारने त्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका एप्रिल 2021 पर्यंत राज्य सरकारने दिलेल्या सल्ल्यानुसार पुढे ढकलल्या आहेत.
प्रचार सभांमुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो
राज्यात अद्याप कोविडचा फैलाव संपुष्टात आलेला नाही. परिस्थिती निवळल्यानंतरच निवडणुका घेतल्या जातील, असे अधिसूचनेद्वारे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. अलिकडेच जिल्हा पंचायत निवडणुका झाल्या. या निवडणुका खरे तर मार्च 2020 मध्ये होणार होत्या. राज्य निवडणूक आयोगाने सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली परंतु कोरोनाच्या फैलावामुळे केवळ मतदान प्रक्रियेच्या 48 तास अगोदर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. 11 डिसेंबर 2020 रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली.
परिस्थितीमध्ये सुधार झाल्यानंतर निवडणुका घेणे शक्य
आयोगाने म्हटले आहे की, जि. पं. निवडणुकीच्या काळात केवळ मतदान प्रक्रियाच शिल्लक राहिली होती. पालिका निवडणुकीत प्रचार असणार, प्रचारसभा होतील. मतदार, कार्यकर्त्यांची गर्दी होईल. त्यातून कोरोनाचा फैलावही वाढू शकतो. त्यामुळे परिस्थितीमध्ये सुधार झाल्यानंतर निवडणुका घेणे शक्य होईल. त्यामुळेच या निवडणुका पुढील 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात येत आहे.
पंचायत पोटनिवडणुका, जिं. पं. राहिलेली निवडणूक
राज्यातील काही ग्राम पंचायतींच्या पोट निवडणुका घ्यायच्या आहेत. तसेच जि. पं. निवडणुकीत एका मतदारसंघांचीही पोट निवडणूक राहिलेली आहे. या सर्वांची एकत्रित निवडणुका घेणे शक्य व्हावे या करिता या सर्व निवडणूक आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील 3 महिन्यांसाठी निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी नमूद केले आहे. यामुळे 11 पालिकांबरोबरच आता पणजी महापालिकेची निवडणूकही पुढे ढकलली व त्यावर 18 मार्चनंतर प्रशासक नियुक्त करणे अपरिहार्य ठरणार आहे.
पणजी मनपा निवडणूकही पुढे ढकलली
पणजी मनपा निवडणूकदेखील पुढे ढकलली जाईल. या महापालिकेची निवडणूक 28 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्याचे निश्चित झाले होते. जे अधिकारीवर्ग निवडणूक प्रक्रियेसाठी काम करणार त्यांच्यावर कोविड लस टोचणीचीही जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे या अतिरिक्त कामाचा ताबा असल्याने त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. सबब निवडणूक पुढे ढकलणे क्रमप्राप्त ठरत आहे.
सांखळी पालिकेची निवडणूक होणार?
सांखळी पालिकेमध्ये सध्या अस्थिर राजकारण असल्याने ही पालिका बरखास्त करुन नव्याने निवडणूक घेणार की केवळ एका प्रभागाची निवडणूक घेणार? हे लवकरच स्पष्ट होईल. एप्रिलमध्ये होणाऱया पालिका निवडणुकीत एकतर सांखळीसाठी नव्याने तरी निवडणूक होईल किंवा एका प्रभागासाठी निवडणूक होईल.