वाहतूकमंत्री गुदिन्हो केंद्रीय मंत्री गडकरींशी करणार चर्चा : निवडणूक असल्याने आमदार, मंत्र्यांना अंमलबजावणी नको
प्रतिनिधी / पणजी
नवा मोटर वाहन कायदा लागू करण्यात निवडणूक वर्ष कारणीभूत ठरले आहे. या नव्या कायद्यातील जाचक अटीमुळे जनतेचा रोष पत्करण्यास सरकारमधील एकही आमदार वा मंत्री तयार नाही. तथापि, आज वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी ऑनलाईन एका परिषदेतून चर्चा करणार आहेत. त्यात कोणता निर्णय होईल त्यावर या नव्या कायद्याच्या अंमलबजावणीची भिस्त अवलंबून आहे.
नव्या मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी जवळपास सर्वच राज्यांनी केलेली आहे. गोव्याने मात्र अद्याप तयारी दर्शवलेली नाही. यंदाचे हे निवडणूक वर्ष आहे आणि नव्या मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी झाल्यास सारे गोमंतकीय सरकारच्या विरोधात जातील, असे मंत्री व सत्ताधारी आमदारांना वाटते.
निवडणुकीनंतर अंमलबजावणीची मागणी
दोन वेळा हा नवा मोटर वाहन कायद्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला असता काही मंत्र्यांनी हस्तक्षेप करून प्रस्ताव पुढे ढकलण्यास भाग पाडले. पुढच्या फेब्रुवारीमध्ये गोवा विधानसभेची निवडणूक होणार असून ही निवडणूक झाल्यानंतरच या कायद्याची अंमलबजावणी करावी, असे मत बहुतेक मंत्र्यांनी मांडलेले आहे. सत्ताधारी आमदारांनीदेखील हा कायदा पुढे ढकलावा, अशी मागणी सरकारकडे केली.
देशातील सर्व वाहतूकमंत्र्यांची आज बैठक
दरम्यान, केंद्राने आतापर्यंत गोव्याला 4 वेळा निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. तरीदेखील गोवा सरकार एका निर्णयाप्रत येत नाही. या कायद्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास प्रचंड दंडात्मक कारवाईचा समावेश आहे. अंमलबजावणीनंतर जनता निश्चित संतप्त होईल. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज मंळगवारी 19 रोजी सायंकाळी 4 वाजता देशातील सर्व परिवहनमंत्र्यांची ऑनलाईन बैठक बोलावली आहे. या बैठकीत गोव्याचे परिवहन मंत्री माविन गुदिन्हो सहभागी होत आहेत.
गोव्याला सूट मिळण्याची शक्यता कमीच
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवा परिवहन कायदा आणखी 1 वर्ष पुढे ढकलण्याची मागणी गुदिन्हो करतील. जर गडकरींनी मान्यता दिली तरच या कायद्याची अंमलबजावणी गोव्यात एक वर्ष पुढे ढकलली जाईल. जर गोव्याचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला तर बुधवारी होणाऱया राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय होऊ शकतो. सर्व राज्यांपेक्षा गोव्याला वेगळी वागणूक देता येत नसल्याने गडकरी तशी खास सूट गोव्याला देतील, असे वाटत नाही.
उपलब्ध माहितीनुसार टॅक्सीप्रश्नी मुख्यमंत्री तसेच मंत्री मायकल लोबो आणि मंत्री माविन गुदिन्हो यांची काल बैठक आल्तिनो येथे झाली. आज गडकरी यांच्याबरोबर होणाऱया बैठकीपूर्वी नवा मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री व माविन गुदिन्हो यांच्या दरम्यान चर्चा झाली.