पाचच मिनिटात ऑनलाईन लिंकवरील प्रक्षेपण थांबले
प्रतिनिधी/ सातारा
तब्बल 143 विषयांच्या मंजूरीसाठी सातारा पालिकेची ऑनलाईन स्थायी सभेचे नियोजन सोमवारी करण्यात आले होते. सभेच्या नोटीसा दि. 17 रोजीच स्थायी समितीच्या सदस्यांना पोहच झाल्या होत्या. मात्र, सभेच्या दिवशी सभेची ऑनलाईन लिंक मोबाईलवर देवूनही केवळ तीन पदाधिकाऱयांची हजेरी होती. त्यामुळे कोरमअभावी सभाच रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली.
विकास कामांना मंजूरी देण्यासाठी सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. त्या सभेकरता नोटीस दि. 17 रोजी पोस्टाने देण्यात आले होते. सभेकरता अजेंडय़ावर 143 विषय ठेवण्यात आले होते. नियोजन करुन ऑनलाईन सभेच्या लिंक पदाधिकाऱयांच्या मोबाईलवर सोडण्यात आल्या होत्या. सभा सकाळी 11 वाजता सुरु करण्यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम या लगबगीने केबीनमध्ये येवून सभेला प्रारंभ करण्यासाठी लॅपटॉपवर प्रयत्न केला. दरम्यान, पाचच मिनिटामध्ये सभेला आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे या दोघी अन् नगराध्यक्षा माधवी कदम अशा तिघींचीच हजेरी असल्याने सभाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सभा रद्द करण्यात आली. या सभेला घरगुती कारणास्तव उपनगराध्यक्ष मनोज शेंडे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यासोबतच विरोधी पक्ष नेते अशोक मोने, नगरसेवक निशांत पाटील, नगरसेवक दत्ता बनकर यांच्यासह इतर पदाधिकाऱयांनीही हजेरी लावली नव्हती.