पँथर्सच्या विजयात अर्जुन देस्वालचा पुन्हा एकदा सिंहाचा वाटा, हरियाणातर्फे मितूची चमक
बेंगळूर / वृत्तसंस्था
प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील साखळी सामन्यात जयपूर पिंक पँथर्स व हरियाणा स्टीलर्स संघांनी दमदार विजय संपादन केले. जयपूर पिंक पँथर्सने स्पर्धेतील 39 व्या लढतीत पुणेरी पलटण संघाचा 31-26 असा पराभव केला तर हरियाणा स्टीलर्सने विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सला 41-37 अशा फरकाने मात दिली.
या स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीत जयपूर पिंक पँथर्सच्या विजयात रायडर अर्जुन देस्वाल पुन्हा एकदा स्टार ठरला. त्याने आणखी एकदा सुपर-10 नोंदवताना 11 गुणांची कमाई केली. डिफेंडर संदीप व सहुल कुमार यांनी प्रत्येकी 4 गुण मिळवले. या विजयासह पहिल्या आवृत्तीतील हा चॅम्पियन संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी झेपावला.
जयपूर पिंक पँथर्सने अर्जुन देस्वालच्या लक्षवेधी चढायांमुळे उत्तम सुरुवात केली. कर्णधार दीपक हुडा प्रारंभी राखीव खेळाडूंमध्ये होता. या संघाने लेफ्ट कॉर्नरमध्ये संदीपला खेळवले आणि त्याच्या हजेरीमुळे बचाव फळी अधिक भक्कम होण्यात मदत झाली. पुण्याच्या मोहित गोयत व पंकज मोहिते यांचे मनसुबे उधळून लावण्यात ही बाब महत्त्वाची ठरली. अर्थात, पुण्याचे हे नेक्स्ट जनरेशन स्टार नंतर काही प्रमाणात मुसंडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. पंकज-मोहितसह अस्लम इनामदारने देखील चढायांमध्ये उत्तम गुणांची कमाई केली. पहिल्या सत्राअखेर जयपूरकडे 18-17 अशी एका गुणाची निसटती आघाडी होती.
दुसऱया सत्राच्या प्रारंभी दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्र्यावर अधिक भर दिला. जयपूरने त्यानंतर हुडाला मैदानात आणले. मात्र, अर्जुन देस्वालचे योगदान अधिक महत्त्वाचे ठरले. या युवा रायडरने शेवटची 10 मिनिटे बाकी असताना सुपर-10 गुण नोंदवले. यामुळे, पँथर्सचा संघ 3 गुणांनी आघाडीवर आला. बदली खेळाडू नितीन तोमरने पुण्यासाठी महत्त्वाचे गुण मिळवले. प्रशिक्षक अनुप कुमार यांची शेवटच्या काही मिनिटात संयमावर भर देण्याची सूचना होती. पण, पुण्याचा संघ शेवटची 2 मिनिटे बाकी असताना ऑल-आऊटची नामुष्की टाळू शकला नाही. संदीप व सहूल यांचा भक्कम बचाव देखील महत्त्वाचे ठरला. अंतिमतः पँथर्सने या लढतीत बाजी मारली.
विद्यमान विजेत्यांना धक्का
दिवसभरातील अन्य एका लढतीत हरियाणा स्टीलर्सने विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सला 41-37 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. बंगालने प्रारंभी आघाडी घेतली होती. पण, नंतर त्यांना ती टिकवता आली नाही. हरियाणाच्या विजयात सुपर-10 नोंदवणाऱया मितूचा खेळ लक्षवेधी ठरला. वॉरियर्सकरिता मनिंदर सिंगने 14 गुणांची कमाई केली.
पहिल्या टप्प्यात हरियाणाचे जयदीप व सुरेंदर उत्तम फॉर्ममध्ये होते तर बंगालकरता सचिन व अबोझर यांनी कॉर्नर्समध्ये खेळ गाजवला. मनिंदर सिंगला त्याच्या दोन चढायांमध्ये सहज टॅकल केले गेले होते. शिवाय, मोहम्मद नबीबक्षलाही फारसे यश मिळाले नव्हते. वॉरियर्सने थोडाफार प्रतिकार केला असला तरी त्यांना विजयापासून दूर रहावे लागल्याचे नंतर सुस्पष्ट झाले. मध्यंतरावेळी बंगालचा संघ 18-15 फरकाने आघाडीवर होता. ती आघाडी त्यांनी थोडय़ाफार फरकाने कायम राखत विजय संपादन केला.