गोवा-पंजाब-उत्तराखंडमध्ये 14 फेबुवारीला मतदान ः उत्तर प्रदेशमध्ये सात, मणिपूरमध्ये दोन टप्पे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा शनिवारी निवडणूक आयोगाने केली. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असून पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून सर्व पाचही राज्यातील निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. कोरोना संसर्गामुळे विधानसभा निवडणुकीच्या या ‘रणसंग्रामा’त कडक प्रोटोकॉल पाळला जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले. त्यानुसार सद्यस्थितीत 15 जानेवारीपर्यंत रोड शो, रॅली, पदयात्रा, सायकल आणि स्कूटर रॅलीला परवानगी दिली जाणार नाही. केवळ व्हर्च्युअल रॅलीद्वारेच निवडणुकीच्या प्रचाराला परवानगी असेल. तसेच निकालानंतर कोणतीही विजयी मिरवणूक काढू नये, असे निर्देशही आयोगाने जारी केले.
पाच राज्यांमधील निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे आता आचारसंहिताही लागू झाली आहे. उत्तर प्रदेशातून 10 फेब्रुवारीपासून मतदानाला प्रारंभ होणार आहे. देशातील 5 राज्यांमध्ये एकूण 690 जागांसाठी मतदान होणार आहे. 18.34 कोटी मतदार या निवडणुकीत भाग घेतील. कोरोना दरम्यान निवडणुका घेण्यासाठी नवीन प्रोटोकॉल लागू केले जातील. सर्व निवडणूक कर्मचाऱयांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले असतील. तसेच आवश्यकतेनुसार बूस्टर डोसही दिले जाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी जाहीर केले आहे. 80 पेक्षा जास्त वय असणारे मतदार, दिव्यांग आणि कोरोनाबाधितांसाठी पोस्टल बॅलेट वोटिंग असणार असेही निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तसेच पाच राज्यांच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पर्याय आहे. हा पर्याय बंधनकारक नसून ऐच्छिक आहे.
कोरोना स्थितीमुळे जाहीर प्रचारावर निर्बंध
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱया पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणाऱया सर्व कर्मचाऱयांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, सायकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री 8 नंतर निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर-टूöडोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
मतदारांमध्ये मोठी वाढ
या निवडणुकीत एकूण 18.34 कोटी मतदार सहभागी होतील. त्यापैकी 8.55 कोटी महिला मतदार आहेत. सर्व पाच राज्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढले आहे. सर्वाधिक 29 टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात 24 टक्के, मणिपूरमध्ये 19 टक्के, उत्तराखंड 18 टक्के तर पंजाबमध्ये 10 टक्के महिला मतदारांचे प्रमाण वाढले आहे. तसेच 24.9 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामध्ये 11.4 लाख महिला मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
मतदान केंद्रांमध्ये सुसज्जता
कोरोना संसर्गाच्या काळात होणाऱया या निवडणुकीमुळे मतदान केंद्रातील गर्दी कमी करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1,250 मतदार असतील. आता एकूण मतदान केंद्र 2 लाख 15 हजार 368 आहेत. यातील 1,620 मतदान केंद्रे ही पूर्णपणे महिला कर्मचाऱयांमार्फत सांभाळली जातील. तसेच काही मतदान केंद्रे दिव्यांग व्यक्तींकडून हाताळली जातील. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर्स अशा आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. एकूण 900 निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.
पाच राज्यांमध्ये 690 मतदारसंघ
पाच राज्यांमधील रणधुमाळीदरम्यान 690 मतदारसंघात निवडणुका होतील. यामध्ये गोव्यातील 40, मणिपूरमधील 60, उत्तराखंडमधील 70, पंजाबमधील 117 आणि उत्तर प्रदेशमधील 403 जागांचा समावेश आहे.
तीन उद्दिष्टे निश्चित
निवडणुकांसाठी आयोगाने तीन प्रमुख उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यानुसार पहिले म्हणजे कोविड सुरक्षित निवडणूक, दुसरे मतदारांना कोणत्याही अडचणीविना मतदानाचा अनुभव आणि तिसरे सर्वाधिक मतदानाची टक्केवारी गाठण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
निवडणूक कार्यक्रमातील लक्षवेधी मुद्दे…
कोरोनामुळे निवडणुका आव्हानात्मक – नवीन कोविड प्रोटोकॉल लागू
कोरोनाबाधित मतदान करू शकतील – रुग्णांना पोस्टल बॅलेट सुविधा
16 टक्के मतदान केंद्रे वाढली – एकूण 2.15 लाखांहून अधिक केंदे
एका मतदान केंद्रावर अधिकाधिक 1,500 ते 1,250 मतदारांची सोय
80 पेक्षा जास्त वयाचे मतदार, दिव्यांगांना पोस्टल बॅलेट वोटिंगची सुविधा
कोरोनाबाधितांसाठीही घरातून किंवा इस्पितळातून हक्क बजावता येईल
राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
उमेदवारांना ऑनलाईनद्वारे अर्ज दाखल करण्याचा पर्याय.
निवडणूकविषयक सर्व कार्यक्रमांची व्हिडीओग्राफी करावी.
पक्षांना उमेदवारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड घोषित करावे लागेल.
उमेदवारालाही स्वतःचा गुन्हेगारी इतिहास सांगावा लागेल.
मणिपूर आणि गोव्यात उमेदवार खर्चमर्यादा 28 लाख रु.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडमध्ये खर्चमर्यादा 40 लाख रु.
कोणत्या राज्यात कधी मतदान ?
उत्तर प्रदेश – 7 टप्प्यात मतदान
पहिला टप्पा – 10 फेब्रुवारी
दुसरा टप्पा – 14 फेब्रुवारी
तिसरा टप्पा – 20 फेब्रुवारी
चौथा टप्पा – 23 फेब्रुवारी
पाचवा टप्पा – 27 फेब्रुवारी
सहावा टप्पा – 3 मार्च
सातवा टप्पा – 7 मार्च