प्रतिनिधी/ बेळगाव
हत्तरगी येथे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीच्या काळात झालेल्या गोळीबाराची पाळेमुळे खणताना मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून दोन गावठी पिस्तुली, एक मॅक्झीन, दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
युवराज सुर्याजी उर्फ सुरेश नाईक (वय 25, रा. मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखली हुक्केरीचे मंडल पोलीस निरीक्षक जी. आय. कल्याणशेट्टी, यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
16 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11.30 वाजता हत्तरगी येथील भरमा भूपाल धुपदाळी यांच्यावर यमकनमर्डीत गोळीबार झाला होता. या प्रकरणी यमकनमर्डी पोलीस स्थानकात भा.दं.वि. 307 व भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आले होते. ऐन ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत घडलेल्या या घटनेने खळबळ माजली होती.
पोलिसांनी विनायक सोमशेखर व्हरकेरी (रा. यमकनमर्डी) याला 1 जानेवारी रोजी अटक करुन त्याच्या जवळून एक गावठी पिस्तुल जप्त करण्यात आली होती. त्यानंतर विनायकला पिस्तुल पुरविल्याच्या आरोपावरुन निखील वसंत भोसले (रा. दुंडगा, ता. गडहिंग्लज) याला 2 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. आता युवराजला अटक करण्यात आली आहे.
गावठी पिस्तुली कोठून आल्या?
या प्रकरणी आतापर्यंत तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. तीन गावठी पिस्तुली, मॅक्झीन, जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही शस्त्र कोठुन आली? याची चौकशी करण्यात येत आहे. संशयितांच्या चौकशीत मुंबईहून आणल्याचे उघडकीस आले असून त्या दिशेने तपासाची चपे फिरविण्यात आली असली तरी ही शस्त्र मध्यप्रदेश बनावटीची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.