सेलिब्रिटी कलाकारांचे कधी एअरपोर्टवरचे तर कधी पार्टीला जातानाचे, प्रमोशनसाठी हॉटेलच्या लॉबीमधले इतकेच नव्हे तर जिमच्या वाटेवरचे फोटो चाहत्यांपर्यंत पोहोवण्यासाठी त्यांच्या पाळतीवर असतात ते पापाराझी. सेलिब्रिटींना गाठून क्लिक करण्यासाठी या पापाराझींना सतत पायाला भिंगरी लावावी लागते. गडबडीत गाडीत बसून सुसाट जाणारा सेलिब्रिटी किमान कारविंडोमधून तरी दिसेल यासाठी हेच पापाराझी कलाकारांच्या गाडीमागे धावतानाही दिसतात.
अशाच एका पापाराझीला बॉलीवूडची बेबो करिना कपूर खान हिच्या कारची धडक लागली. त्याच्या पायाला जखम झाल्याचे पाहून करिनाने ड्रायव्हरला किंचाळूनच पीछे हटो, संभालो यार म्हणत थांबवले आणि फिल्मी फोटोग्राफरला फोटोसाठी न धावण्याचा सल्लाही दिला. बेबोच्या फोटोसाठी ही धावपळ करणाऱया फोटोग्राफर विरल भयानी याने हा व्हिडिओ त्याच्या सोशलमीडियावर शेअर केल्यानंतर या पोस्टला खूपच हिट मिळत आहेत.
दोन दिवसांपूर्वी बॉलीवूडची हॉटस्टार मलायका अरोरा हिला अपघात झाला होता. ती आता डिस्चार्ज घेऊन घरी आली आहे. तिचा बॉयप्रेंड अर्जुन कपूर याने तर तिची भेट घेऊन खुशाली विचारलीच पण आता मलायकाची इंडस्ट्रीतील खास मैत्रीण करिना कपूरने मलायकाच्या घरी भेट दिली. मलायकला भेटण्यासाठीच जात असतानाच हा सीन झाला. करिना मलायकाच्या घरी जाणार आहे या बातमीचा वास फिल्मी फोटोग्राफरला लागला आणि त्यांनी या वाटेवर कॅमेरा घेऊन ठाण मांडलं. करिनाच्या गाडीमागे धावत असताना त्या पापाराझीला धक्का लागला. करिनाने जोरात किंचाळून ड्रायव्हरला थांबवलं नसतं तर पापाराझीची काही खैर नव्हती.