कार्तिक त्यागीचा उसळता चेंडू लागल्याने जखमी
वृत्तसंस्था/ सिडनी
भारताविरुद्धच्या मालिकेत कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्की कार्तिक त्यागीचा उसळता चेंडू लागून जखमी झाल्याने त्याला 11 डिसेंबरपासून भारत अ विरुद्ध सुरू होणाऱया दुसऱया सामन्यातून वगळण्यात आले आहे.
17 डिसेंबरपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली कसोटी ऍडलेडमध्ये सुरू होणार असून या सामन्यात पुकोवस्कीला निश्चितपणे पदार्पणाची संधी मिळणार, असे मानले जात होते. नियमित सलामीवीर डेव्हिड वॉर्नर जखमी असल्याने त्याची निवड निश्चित झाली होती. सध्या ऑस्ट्रेलिया अ व भारत अ यांच्यात सामना सुरू असून दुसऱया डावातील 13 व्या षटकावेळी भारत अ चा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीचा उसळता चेंडू पुकोवस्कीच्या हेल्मेटवर जोरात आदळल्यानंतर त्याला भोवळ आली. यावेळी तो 23 धावांवर खेळत होता. ‘पुकोवस्कीला कन्कशनची हलकी लक्षणे दिसून आली. पण तो कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःहून चालत मैदानाबाहेर गेला,’ असे संघाचे डॉक्टर जॉन ऑर्चर्ड यांनी सांगितले. ‘मेडिकल रूममध्ये त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवले असून तो स्टाफ सदस्य, संघसहकारी आणि कुटुंबियांशीदेखील मोकळेपणाने फोनवरून बोलत आहे. तो संघासमवेतच राहणार आहे. मात्र भारत अ विरुद्ध सिडनीत होणाऱया तीन दिवसीय सामन्यात तो खेळणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले.
पुकोवस्कीच्या हेल्मेटच्या समोरील जाळीवर चेंडू जोरात आदळल्यानंतर तो खाली गुडघ्यावर टेकून बसला. तशाच अवस्थेत काही मिनिटे थांबल्यानंतर तो चालत मैदानाबाहेर गेला. त्याने बॅट हातातून टाकल्यानंतर लगेचच मेडिकल पथकाने मैदानात धाव घेतली. त्याला झालेल्या आघातामुळे पहिल्या कसोटीतील त्याच्या उपलब्धतेविषयी शंका निर्माण झाली आहे. मात्र डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तो स्वतःहून चालत गेला असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. 22 वर्षीय पुकोवस्कीला आजवरच्या कारकिर्दीत अनेकदा कन्कशनच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे.