2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्फिंग, क्लायम्बिंगसह समावेश
वृत्तसंस्था/ लॉसेन
तरुणाईला अत्यंत आवडणारा नृत्यप्रकार म्हणजे ‘बेक डान्स’. त्यांच्या या ब्रेक डान्समधील कौशल्याला आता पदकाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला असून 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेक डान्सचा समावेश केला असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय अन्य काही क्रीडा प्रकारांचाही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समावेश केला असल्याचे आयओसी कार्यकारी मंडळाने जाहीर केले. त्यात स्केट बोर्डिंग, क्लायम्बिंग व सर्फिंग या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
या तीन क्रीडा प्रकारांचे पुढील वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकमध्येच पदार्पण होणार आहे. मात्र पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांना त्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ हवा असल्याने काही क्रीडा प्रकारांची चाचणी घेतली गेली असूनही आयओसीने इतक्यातच पॅरिसमधील क्रीडा प्रकारांची घोषणा करण्याचे टाळले आहे. ब्रेकडान्सला ऑलिम्पिकमध्ये ब्रेकिंग या नावाने ओळखले जाणार आहे. 1970 च्या दशकात अमेरिकेतील हिपहॉप डान्सची सुरुवात करणाऱयांनी त्याला हेच नाव दिले होते. 2018 मध्ये ब्युनॉस एअर्स येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत त्याची सकारात्मक चाचणी घेतल्यानंतर दोन वर्षांपूर्वीच पॅरिसच्या आयोजकांनी ब्रेकडान्स सामील करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि मागील वर्षी आयओसी मंडळ व पूर्ण सदस्यांनी विविध टप्प्यावर मंजुरी देत ब्रेकिंगला मान्यता दिली होती.
पॅरिसमध्ये ब्रेकिंग स्पर्धा शहरातील केंद्रावर होणार असून स्पोर्ट क्लायम्बिंग व 3-3 बास्केटबॉल क्रीडा प्रकारही प्लेस डी ले कॉन्कॉर्ड येथे घेतले जाणार आहेत. सर्फिंग मात्र फ्रान्सपासून 15000 किलोमीटर्स दूर पॅसिफिक महासागरात ताहितीच्या किनाऱयावर घेतले जाणार आहे. गेल्या मार्चमध्येच आयओसीने त्याला तशी मान्यता दिली होती.