सिद्धार्थ मल्होत्रा अन् रश्मिका मंदानाची जोडी
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘मिशन मजनू’ चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची प्रतीक्षा अधिकच लांबली आहे. हा चित्रपट 13 मे 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. शांतनु बागची यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटातून दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
‘शेरशाह’ चित्रपटाच्या यशानंतर सिद्धार्थच्या या आगामी चित्रपटाची मोठी चर्चा आहे. पीरियड ड्रामापट असलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसून येईल. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र प्रसारित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टला एका तासातच 1 लाख 85 हजरा लाइक्स प्राप्त झाले आहेत.
या चित्रपटात सिद्धार्थ तसेच रश्मिका यांच्यासह शारिब हाशमी, परमीत सेठी, अनंत महादेवन आणि कुमुद मिश्रा हे कलाकार आहेत. जाहिरातीच्या जगतात नाव कमावलेले शांतनू बागची या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि रश्मिका यांची जोडी दिसून येणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला, अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांनी केली आहे. चित्रपटाची कथा भारत-पाकिस्तान संबंधांवरील सत्य घटनेवर आधारित आहे. या ऐतिहासिक चित्रपटात 1970 च्या दशकात पाकिस्तानच्या भूमीवरील भारताचे सर्वात महत्त्वाकांक्षी रॉ ऑपरेशन उलगडले जाणार आहे.