वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सहा वेळाची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोम व ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱया अन्य दोन महिला बॉक्सर्स आता पुणे येथील आर्मी क्रीडा इन्स्टिटय़ूट येथे टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी करणार आहेत. याआधी दिल्लीमध्ये महिला बॉक्सर्ससाठी राष्ट्रीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. पण बॉक्सर व साहाय्यक स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते शिबिर रद्द करण्यात आले होते.
मेरी कोमसमवेत (51 किलो) लवलिना बोर्गोहेन (69 किलो) व सिमरनजित कौर (60 किलो) या पुण्यामध्ये ट्रेनिंग घेणार आहेत. लवलिना याआधीच केंद्रात दाखल झाली असून सिमरनजित कोव्हिड 19 चाचणी झाल्यानंतर ट्रेनिंगला सुरुवात करणार आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी या तिघींना तीन वेगवेगळय़ा गटात सरावाच्या जोडीदारांसह ठेवण्यात येणार आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पूजा रानी (75 किलो) मात्र बेळ्ळारीतील इन्स्पायर क्रीडा इन्स्टिटय़ूट येथेच यापुढेही सराव करणार आहे. मेरी कोमचे प्रशिक्षक व माजी बॉक्सर छोटे लाल यादव हे मात्र मेरी कोमसमवेत लगेचच उपलब्ध असणार नाहीत. गेल्या महिन्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयसोलेशनमध्ये आहेत. येत्या काही दिवसांत त्यांची पुन्हा एकदा चाचणी होणार असून त्यात ते निगेटिव्ह आढळल्यास या शिबिरात दाखल होतील. ‘मी आज टेनिंगसाठी रवाना होत आहे. नियोजित ठिकाणी छोटेलाल नंतर दाखल होतील. ते आल्यानंतर आमचे ट्रेनिंग व्यवस्थित सुरू होईल. ट्रेनिंगच्या कालावधीत मी लसीकरणही करून घेणार आहे,’ असे मेरी कोम म्हणाली.
‘दिल्लीतील शिबिर रद्द केल्यानंतर आमच्या ट्रेनिंगची वाटच लागली होती. पण आताचे शिबिर निर्धोकपणे पार पडेल, अशी मी आशा करते. एएसआय केंद्रावर मला पुरुष बॉक्सर्सविरुद्धही कदाचित सराव करावा लागेल. फिटनेससाठी मी नेहमी असा सराव करीत असते,’ असे मेरी कोम म्हणाली.
आशियाई चॅम्पियनशिप हे त्यांच्यापुढील सर्वात मोठी व पहिली स्पर्धा असणार आहे. कोव्हिडमुळे ही स्पर्धा दिल्लीऐवजी दुबईत खेळण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला होता. 21 एप्रिलपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. ‘ही एक मोठी स्पर्धा असून ऑलिम्पिकआधी अशा स्पर्धेची आम्हाला गरजच होती. ट्रेनिंग व जोडीदाराबरोबर लढणे ही वेगळी गोष्ट आहे. पण प्रत्यक्ष स्पर्धेत खेळण्याने आपला कस लागतो आणि आपल्या तयारीचा आढावा घेण्याची संधी मिळते,’ असेही ती यावेळी म्हणाली.
14 एप्रिल रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवरील शिबिरावेळी भारतीय महिला बॉक्सिंगचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर राफाएल बर्गामास्को व प्रमुख प्रशिक्षक मोहम्मद अली कमर यांच्यासह एकूण 21 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बर्गामास्को व कमर हे त्यातून पूर्ण बरे झाले आहेत, पण ते अद्याप शिबिरात दाखल झालेले नाहीत. बर्गामास्को वैयक्तिक कारणासाठी सध्या इटलीत आहेत तर अली कमर कोलकात्यातील आपल्या निवासस्थानी आयसोलेशन कालावधी पूर्ण करीत आहेत. आशियाई चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक स्पर्धा जवळ असल्याने उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यावर आमचा भर असून जास्तीत जास्त ट्रेनिंग करण्याचा आमचा मानस आहे,’ असे बीएफआयचे सरचिटणीस हेमंता कलिता म्हणाले. खेळाडू, प्रशिक्षक, साहाय्यक स्टाफ यांची सुरक्षा विचारात घेऊन संसर्गाचा धोका टाळण्यासाठी गटागटाने ट्रेनिंग घेण्याची योजना आखली आहे. वेळ कठीण असल्याने जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक बनले आहे, असेही कलिता म्हणाले.
एएसआयमधील शिबिराला भारतीय क्रीडा प्राधिकरणने गेल्या जुलैमध्येच मान्यता दिली आहे. येत्या 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होणार आहेत. ऑलिम्पिकला जाणाऱया खेळाडूंव्यतिरिक्त युवा वर्ल्ड चॅम्पियन अरुंधती चौधरी (69 किलो), मंजू रानी (48 किलो), सोनिया लाथेर (57 किलो), लालबुआसैही (64 किलो), शशी चोप्रा (64 किलो), जस्मिन (57 किलो) यांनाही ट्रेनिंगसाठी निवडण्यात आले आहे.