जगातील सर्वात मोठे क्रिकेट संग्रहालय म्हणून गौरव
प्रतिनिधी / पुणे
पुण्यातील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालया’ची जगातील सर्वात मोठे क्रिकेट संग्रहालय म्हणून विश्वविक्रमी नोंद करण्यात आली आहे. संग्रहालयात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संपूर्ण जगभरातील विविध खेळाडूंच्या 51 हजारहून अधिक संस्मरणीय क्रिकेट वस्तूंचे संकलन येथे पाच हजार चौरस फुटाच्या भव्य गॅलरीमध्ये केलेले आहे. त्यामुळे अमेरिकेतील मिआमी येथील ‘वर्ल्ड रेकॉर्ड अकादमी’ यांनी या संग्रहालायला ‘विश्वविक्रमा’ने पुरस्कृत केल्याचे संग्रहालयाचे संस्थापक व स्वतः क्रिकेट उत्तम खेळाडू असणारे रोहन पाटे यांनी सांगितले.
या भव्य गॅलरीमध्ये अनेक बॅट्स व बॉल्स आहेत, ज्यावर त्या त्या वषीच्या विश्वचषक विजेत्या संघांच्या कप्तानांची स्वाक्षरी आहे. शिवाय सर डोनाल्ड ब्रॅडमॅन, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, देसमंड हेन्स, सर विवीयन रिचर्ड, इम्रान खान, सुनील गावस्कर अशा अनेक खेळाडूंनी वापरलेले क्रिकेट साहित्य आहे. याबरोबरच विश्वचषक सामने विजेत्या संघाच्या व टी20 विश्व सामन्यांच्या प्रत्येक खेळाडूची स्वाक्षरी असलेल्या वस्तू येथे आहेत. पुण्यातील या संग्रहालयाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील 450 खेळाडू आजवर भेट देऊन गेले आहेत. सध्या हयात नसलेल्या अनेक नामवंत खेळाडूंच्या दुर्मिळ क्रिकेट साहित्याचे येथे संकलन आहे.
या उपलब्धीमुळे पुण्यातील या ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालया’ने आपल्याकडील संग्रहित वस्तूंच्या बळावर लंडनचे लॉर्डस क्रिकेट संग्रहालय, ऑस्ट्रेलियातील द ब्रॅडमॅन संग्रहालय, ग्रेनाडामधील वेस्ट इंडीज क्रिकेट हेरीटेज सेंटर, न्यूझीलंड क्रिकेट संग्रहालय, अशा बऱयाच संग्रहालायांना मागे टाकले आहे. याविषयी बोलताना पाटे म्हणाले, क्रिकेट हा भारतीयांसाठी एक धर्मच आहे. या खेळासाठी असेलेला माझा ओढा, आवड यातूनच हे सारे घडू शकले. मला असे वाटते की, महाराष्ट्रातील या क्रिकेट संग्रहालयाला एवढा मोठा सन्मान मिळणे, हा येथील जनतेच्या मुकुटात रोवलेला एक मनाचा तुरा आहे. ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालया’ला जागतिकस्तरावर मिळालेल्या या मान्यतेमुळे मला आता भारतातील सर्व मोठय़ा शहरांमध्ये असे संग्रहालय सुरु करायचे आहे. याची सुरुवात मी मुंबईपासून करणार आहे.