पुणे / प्रतिनिधी :
मराठी भाषेतील नियतकालिकांसमोरील विविध स्वरूपातील समस्या सोडवण्यासाठी अनौपचारिक स्वरुपात गेली काही वर्षे कार्यरत असणाऱ्या मंडळींच्या पुढाकाराने पुण्यात अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी जडणघडण मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांची, सचिवपदी भालचंद्र कुलकर्णी (संपादक – सहकार सुगंध) यांची, तर उपाध्यक्ष म्हणून चपराक साप्ताहिकाचे संपादक घनश्याम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
देशभरातील एकूण मुद्रित माध्यमांतील नियतकालिकांच्या 15 टक्के नियतकालिके मराठी भाषेत आहेत. शिवाय शंभरहून अधिक वर्षांची दिवाळी विशेषांकांची परंपरा केवळ याच भाषेने समृद्धपणे जपली आहे.मात्र, गेल्या काही वर्षात मराठी भाषेतील नियतकालिकांसमोर अनेक नवी आव्हाने उभी आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मराठी भाषेतील नियतकालिकांची परिस्थिती आणखी समृद्ध व्हावी, यासाठी अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेची स्थापन करण्यात आली आहे.
सूर्यकांत पाठक (ग्राहकाहित), अमित व्रोडेकर (वनराई), आनंद अवधानी (अनुभव), अभय कुलकर्णी (माहेर व मेनका), सुनील गायकवाड (वेदांतश्री), विनोद शिरसाठ (साधना), पी. जी. शर्मा (व्यापारी मित्र) यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य नियतकालिकांच्या मालक-संपादकांनी या संघटनेच्या वतीने राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांसाठी सहयोग देण्याचे ठरवले आहे.