प्रतिनिधी/ बेळगाव
एसएसएलसी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असून ही परीक्षा 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. यामुळे पुनर्परीक्षार्थींना परीक्षेचा अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार 31 ऑगस्टपर्यंत शिक्षण विभागाकडे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून पुनर्परीक्षेसाठी साधारण 12 हजार 561 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. यावरून 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या अधिक असल्याचे अधोरेखित होत आहे.
कोविड-19 चा धोका वाढत असतानाच परीक्षा तब्बल तीन महिने लांबणीवर पडली यामुळे प्रेशर्स विद्यार्थ्यांबरोबरच पुनर्परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांचा निकाल देखील घसरला. परिणामी पुरवणी परीक्षेत विद्यार्थी संख्येचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार आतापर्यंत परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12 हजारहून अधिक आहे. यंदाच्या परीक्षेत प्रेशर्स विद्यार्थ्यांपैकी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण 13 हजार आहे. याबरोबरच कॅन्टोन्मेंट झोन तसेच आजारी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रेशर्स विद्यार्थी म्हणून परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येणार आहे. यामुळे पुनर्परीक्षार्थींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.