प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची शाळा बंद आहे. मात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱया शिक्षकांचा पाठ सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ध्यास घेत दरवर्षी घेण्यात येणाऱया शिक्षक प्रशिक्षणाचा घाट सुरू झाला आहे. अर्थात कोरोना, विद्यागम प्रणाली, पाठय़क्रम, जीवनकौशल्य यांची सांगड घालत दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे दररोज विद्यार्थ्यांविना शाळेत हजेरी लावणारे शिक्षक 10 ते 5 यावेळेत प्रशिक्षणाच्या माध्यमातून पाठ घेणार आहेत. शिक्षक आम्ही मात्र आता विद्यार्थी म्हणत प्रशिक्षणाची सक्ती करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच दरवर्षी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र यंदा सदर प्रशिक्षणाला विलंब झाला आहे. प्रत्येकी 40 शिक्षकांच्या गटाला प्रशिक्षण दिले जाते. मात्र कोविड-19 चा धोका ओळखत 20-20 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. शाळानिहाय शिक्षकांच्या बॅचेस करून प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. यामुळे शाळेतील शिक्षक संख्या कमी झाली आहे. तोंडाला मास्क, एका बाकावर एक शिक्षक, त्यातही अंतर, सॅनिटायझर्सचा वापर, थर्मल स्क्रिनिंग करूनच शिक्षकांना प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येत आहे. कोविड-19 चा धोका ओळखत प्रशिक्षणाचे अचूक व्यवस्थापन करण्यात आले आहे.
कोरोनाचा पाठ
प्रशिक्षणात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठरणारी जीवनकेशल्य तसेच पाठय़क्रमावर आधारित मार्गदर्शन असे पाच दिवसांचे नियोजन आखण्यात आले आहे. मात्र कोविड महामारीची संकटछाया विचारात घेत कोविड 19 आणि जीवनशैली आणि सध्याच्या स्थितीत सुरू असणारी विद्यागम शैक्षणिक प्रणाली या विषयांना देखील अंतर्भूत करण्यात आले आहे. यामुळे स्थितीनुसार बदल स्वीकारत कोरोनाचा संसर्ग, लॉकडाऊन आणि बदलत गेलेले सर्वच प्रवाह याविषयी सविस्तर चर्चा करत शिक्षकांनी देखील आपली मते मांडली.