प्रतिनिधी/ लांजा
लांजा तालुक्यातील देवधे-पुनस-सापूचेतळे मार्गावर पुनस पिकअपशेड येथे गावातीलच 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
विनायक चंद्रकांत गुरव (28, पुनस गुरववाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गावातीलच एका ट्रक चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृत विनायक गावातील एका ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. हा अपघात असल्याची चर्चा होती मात्र शरीरावर अपघातसदृश खुणा नसल्याने घातपाताचा संशय प्रथमदर्शनी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुनस ग्रामपंचायतीचे पाणी सोडणारे कर्मचारी रवींद्र कांबळे सोमवारी सकाळी 7च्या दरम्यान पाणी सोडायला गेले होते. यावेळी देवधे-पुनस-सापुचेतळे मार्गावरील पुनस पीकअपशेडनजीक एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दिसून आली. जवळ जाऊन पाहणी केली असता तो गावातीलच तरुण विनायक असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी सरपंच इलियाज बंदरी व पोलीस पाटील यांना माहिती दिली. लांजा पोलिस्थानकाला माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, हेड कॉन्स्टेबल अरविंद कांबळे, श्रीकांत कांबळे, नितीन पवार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता विनायकच्या शरीरावर कुठेच अपघाताच्या जखमा वगैरे कोठेच नसल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी लांजा ग्रामीण रुग्णायलायत पाठवण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीमान केली आहेत. मृत विनायक याच्या सोबत काम करण्याऱया गावातीलच एका चालकाला सोमवारी दुपारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.