पांडुरंग गडदे यांच्या नातलगांचा आरोप
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रविवारी संध्याकाळी रत्नागिरी एस.टी डेपोतील पांडुरंग गडदे या चालकाने हिंदू कॉलनीतील राहत्या खोलीत गळाफास लावून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. मात्र मृत्यूदेह ताब्यात घेण्यासाठी सोमवारी रत्नागिरीत आलेल्या भाऊ शंकर गडदे यांनी हा घातपात असल्याचा आरोप केला आहे.
नांदेड बसफेरीची डय़ुटी करून चालक पांडुरंग गडदे माळनाका हिंदु कॉलनीतील आपल्या खोलीवर गेले होते. त्याच संध्याकाळी त्यांचा सहकारी खोलीवर गेला असता दरवाजा ठोठावूनही तो न उघडल्याने खिडकीतून डोकावून बघितले असता पांडुरंग गडदे गळाफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले होते. याबाबतची माहिती एस्टी विभाग व पेलिसांना कळवण्यात आली. गडदे हे मूळचे बीड येथील असल्याने ही बाब त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आली. सोमवारी सकाळी 11 वाजता पांडुरंग यांचे भाऊ व अन्य नातेवाईक रत्नागिरीत आले. शवागृहातील मृतदेह पाहिला असता मृतदेहावर अनेक जखमा दिसून आल्या. नाकालासुध्दा मोठी जखम झालेली दिसून आली, गडदे यांनी गळफास लावून घेतला असेल तर त्यांच्या अंगावर जखमा कसल्या?, त्यांनी विवस्त्र अवस्थेत गळाफास का लावून घेतला? असे अनेक मुद्दे गडदे यांचे मेहुणे शिवाजी खांडेकर आणि भाऊ शंकर गडदे यांनी उपस्थित केले आहेत. यावरून हा घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या बाबतचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत. एस.टी. अधिकाऱयांनी शहर पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
देवेंद्र फडणवीसांकडून आत्महत्येची दखल
एसटी कर्मचारी पांडुरंग गडदे यांच्या आत्महत्येची विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आह़े एसटी कर्मचाऱयांच्या व्यथा व वेदनांसर्दर्भात सातत्याने पत्रव्यवहार करूनही राज्य शासन दुर्लक्ष करत आह़े त्यामुळेच या आत्महत्येच्या घटना घडत आहेत़ राज्य शासन गडदे यांच्या आत्महत्येची जबाबदारी घेणार का ? असे ट्विट फडणवीस यांनी केले आह़े