ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरापासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. आज सकाळपासून 4 दहशतवाद्यांसह त्यांच्या एका मदतनीसाचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. दरम्यान, या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई केली जात आहे. यामध्ये पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या 44-आरआरचा समावेश आहे.
काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार म्हणाले, पुलवामा जिल्ह्यातील हांजी राजपोरा भागात ही चकमक सुरू आहे. लष्कर-ए-तोयबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एका दहशतवादी मदतनीसालाही ठार करण्यात आले आहे. दरम्यान, एक जवान शहीद झाला आहे. या भागात अद्याप दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.