शानदार सोहळय़ाने टोकियो पॅरालिम्पिक्सचे उद्घाटन, भारताच्या मोहिमेला आज प्रारंभ
टोकियो / वृत्तसंस्था
‘वुई हॅव विंग्ज’, ही सेंट्रल थीम ठेवत टोकियो पॅरालिम्पिक्सचे मंगळवारी शानदार उद्घाटन सोहळय़ाच्या माध्यमातून बिगुल वाजले. प्रतिकूल, आव्हानात्मक स्थितीतही आमची जिद्द कायम आहे, हे दाखवून देण्यासाठी 163 देशातील 4403 पॅरा-ऍथलिट आता सज्ज झाले आहेत. आजपासून दि. 8 सप्टेंबरपर्यंत पॅरालिम्पिक्समधील इव्हेंट्स रंगत राहतील. भारताच्या मोहिमेला टेबलटेनिसमधील लढतीच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे.
केवळ एका बाजूने विंग असलेले विमान दर्शवत टोकियो पॅरालिम्पिक्सचा उद्घाटन सोहळा रंगला. ऑलिम्पिकप्रमाणेच पॅरालिम्पिक्समधील उद्घाटन सोहळा देखील प्रेक्षकांविना झाला. सम्राट नारुहितो यांनी ऑलिम्पिक स्टेडियमवर पॅरालिम्पिक ध्वज फडकवल्यानंतर स्पर्धेची सुरुवात झाल्याची घोषणा केली.
आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक कमिटीचे अध्यक्ष ऍन्ड्रय़ू पॅर्सन्स यांनी 2020 टोकियो पॅरालिम्पिक्स यशस्वीरित्या संपन्न होईल, असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला. ‘आपण सर्व जण इथे आहोत, यावर माझा विश्वास बसत नाही. हा दिवस येईल, यावर अनेकांना साशंकता होती. मात्र, आयोजकांनी विश्वास गमावला नाही. जापनीज प्रशासनाच्या सहकार्याने ते अविरतपणे कार्यरत राहिले’, असे ऍन्ड्रय़ू याप्रसंगी म्हणाले.
कोरोनाच्या अस्मानी संकटात तावून सुलाखून निघाल्यानंतरही पॅरा-ऍथलिट्सनी पॅरालिम्पिक्स यशस्वी करण्याचा निर्धार केला. त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आयोजकांच्या वतीने आभार मानले गेले. त्यानंतर उद्घाटन सोहळय़ाला सुरुवात झाली.
टोकियोमध्ये 57 वर्षांनंतर पॅरालिम्पिक्स परतले असून जापनीज राजधानी पॅरालिम्पिक्स दोनवेळा भरवणारे पहिलेच शहर ठरले आहे. मंगळवारी उद्घाटन सोहळय़ाला पॅरा एअरपोर्टचे स्वरुप दिले गेले होते. काऊंटडाऊन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले गेले.
आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक्स कमिटीचे अध्यक्ष पॅर्सन्स व सम्राट नारुहितो यांचे स्वागत केले गेले. जपानच्या पथकात चार वेळचा ऑलिम्पिक फ्री स्टाईल कुस्ती चॅम्पियन काओरी इचो व रेस्क्यू वर्कर ताकुमी अस्तानी यांच्यासह 6 जणांचा समावेश राहिला.
टोकियो 2020 पॅरालिम्पिक्समधील 22 क्रीडा प्रकार व इव्हेंट्सची ओळख करुन दिली गेल्यानंतर पॅरा एअरपोर्टची रचना साकारली गेली. व्हीलचेअरवरील 13 वर्षीय युई वॅगोने लिटल वन-विंग्ड प्लेनचा परफॉर्मन्स साकारला. केवळ एकच पंख असल्याने उडू शकणार नाही, याची कल्पना असते. पण, सोबतीला असलेल्या अन्य व्हेईकल्सच्या माध्यमातून तिला आत्मविश्वास मिळतो आणि पॅरा एअरपोर्टवरुन ती यशस्वी उड्डाण भरते, असा या परफॉर्मन्सचा आशय राहिला.
उद्घाटन सोहळय़ातील पथ संचलनात इस्रायली पथकाला मार्गदर्शक श्वानाने दाखवलेली दिशा लक्षवेधी ठरली. गोळाफेकीत प्रतिनिधीत्व करणाऱया तेक चंदने भारतीय पथकाचे नेतृत्व केले. मरियप्पन थंगवेलू टोकियोला येत असताना कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर अंतिम क्षणी त्याला उद्घाटन सोहळय़ात सहभागी होता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, ध्वज वाहकाचा सन्मान मरियप्पनऐवजी तेक चंदला लाभला.
यंदा जागतिक स्तरावरील 4403 पॅरा-ऍथलिट्स येथे सहभागी झाले आहेत. 2016 रिओ पॅरालिम्पिक्समध्ये 4328 पॅरा-ऍथलिट्सनी सहभाग घेतला होता.