कच्चे तेल आठ वर्षांच्या विक्रमी टप्प्यावर : निवडणूकांनंतर दर वधारण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात इंधन दर वाढण्याकडे सर्वसामान्यांचे लक्ष नसून आता फक्त उत्तर प्रदेश आणि पंजाबसहीत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकांवरच आहे. मात्र सदरची निवडणूक रणधुमाळी समाप्त होताच इंधन दरात अर्थात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती महाग होण्याचे संकेत आहेत.
असे होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढणाऱया किंमती. किमतीत मागील आठ वर्षांत उच्चांक प्राप्त होण्याकडे कच्च्या तेलाचा प्रवास सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 95 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत. या अगोदर 2014 मध्ये कच्च्या तेलाचे भाव 95 डॉलरवर राहिल्याची माहिती आहे.
1 डिसेंबर 2021 ला कच्च्या तेलाचे भाव 69 डॉलर प्रति बॅरेलवर होते, जे आता 95 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत. म्हणजे अडीच महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती 37 टक्क्यांनी वाढल्याचे दिसले आहे. यावर काही अभ्यासकांच्या माहितीनुसार लवकरच हा दर 100 डॉलर प्रति बॅरेलवर जाण्याची शक्यता आहे.
टेक्सासची ऑईल कंपनी पायोनियर नॅचरल रिसोर्सेजचे स्कॉट शेफिल्ड यांनी, जागतिक पातळीवरील युक्रेन आणि रशिया यांच्यात सध्या तणावपूर्ण युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून हा वाद वाढल्यास कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर ते 120 डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
निवडणूकांचा प्रभाव
सरकार भलेही पेट्रोल-डिझेलच्या किमती निर्धारित करण्यात आपली भूमिका नसल्याचे सांगत असले तरीही मागील वर्षातील स्थिती पाहिल्यास देशातील पाच राज्यांमधील निवडणूकांचा प्रभाव हा पेट्रोल-डिझेल किमतीवर राहणार असल्याचे संकेत आहेत.
भाव वाढणार
कच्च्या तेलाच्या किमती आणखी 15 डॉलर प्रति बॅरेलपेक्षा अधिक महाग होण्याची शक्यता आहे. यावर आधारीत येत्या काळात इंधनाच्या किमती वाढत जाणार असल्याची माहिती आहे.