सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे नगरपालिकेची पोर्तुगीजकालीन पुरातन इमारत पूर्णपणे न पाडता त्याच्या पुढील दर्शनी भाग तसाच ठेवून दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक कलाकार तथा हरी पार्सेकर, नागरिक शेखर पेडणेकर, विश्राम जाधव, व्यंकटेश घोडगे यांनी केली आहे. या संबंधीचे लेखी निवेदन नगराध्यक्ष उषा नागवेकर यांना दिले आहे.
पेडणे नगरपालिकेची इमारत पोर्तुगीजकालीन आहे. ज्याचा मालकी हक्क रावराजे देशप्रभू यांच्याकडे होते. त्यांनी पेडणे पालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी ही इमारत दानपत्र करुन दिली होती. एक उत्कृष्ट बांधकाम नमुना म्हणून ही जुनी इमारत पेडणे शहराची शान वाढवत होती. तीच इमारत आता पूर्णपणे पाडून त्याठिकाणी सुडामार्फत सुमारे 8 कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय नवीन इमारत उभारण्याची योजना आखली आहे. या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ पेडणे दसरोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येणार आहे.
सध्या पालिकेने आपला कारभार पेडणे बसस्थानकातील जागेत स्थलांतर करुन कामकाज चालू केले आहे. सध्या पालिकेकडे महसूल वाढवण्यासाठी कोणत्याच नवीन योजना नाही. हा प्रकल्प उभारला तरच पालिकेला वर्षाकाठी लाखो रुपये महसूल मिळू शकतो, असा विश्वास नगराध्यक्ष उषा नागवेकर आणि पालिका मंडळाने व्यक्त केला आहे.
पेडणे पालिकेची इमारत ही पेडणेची शान : हरी पार्सेकर
यावेळी कलाकार हरी पार्सेकर यांनी प्रतिक्रिया देताना आपण एक कलाकार आणि निसर्गप्रेमी आहे. पेडणे पालिकेची ही पुरातन इमारत एक चांगली वास्तू आहे. पेडणेची शान आहे. प्राचीन इमारतीला धोका पोहचू देवू नये. तसे केले तर आपला व्यक्तीशा विरोध असल्याचे सांगितले. राजकीय पक्ष, कार्यकर्ते सामाजिक संघटना या सर्वांनी एकत्रित येवून इमारत वाचवण्याची गरज आहे.
पुरातन वास्तू पाडू नये : शेखर पेडणेकर
पेडणे शहरात असलेल्या अनेक जुन्या इमारती पेडणेच्या शान आहेत. या इमारती पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. सरकारने आणि पालिकेने पेडणे शहराचे थेट काँक्रिटीकरण न करता हरित परिसर ठेवण्यासाठी हातभार लावावा. असे मत जुन्या इमारतींची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करावे, जागृत नागरिक शेखर पेडणेकर यांनी व्यक्त केले. भाजपचे ज्ये÷ कार्यकर्ते व्यंकटेश घोडगे यांनी सदर इमारतीची दुरुस्ती करण्यात हरकत नाही, असे मत व्यक्त केले.
इमारतीची नोंद पुरातन वास्तू म्हणून नाही : नगराध्यक्ष
पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांच्याकडे संपर्क साधला असता पालिकेची इमारत पुरातन वास्तू अंतर्गत नोंद नाही. शिवाय ही इमारत कमकुवत बनली आहे. इमारतीपासून धोका निर्माण झाल्यामुळे पूर्ण इमारत पाडून तळमजला व वरील दोन मजले उभारण्यात येतील. पहिल्या टप्प्यात वाचनालयापर्यंत इमारत पाडून नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. ही इमारत उभारल्यानंतर अगोदर मासळी मार्केट जवळील दुकानदाराना इमारतीत दुकाने दिल्यानंतर तेथील दुकाने आणि मासळी मार्केट मोडून विस्तारित प्रकल्प उभारला जाणार आहे.