वेळ्ळीतील डॉ. अरावत्तीगी यांचा आपमध्ये प्रवेश
प्रतिनिधी /पणजी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ’हेल्थकेअर मॉडेल’ला जागतिक ख्याती प्राप्त झाली आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी त्याचे कौतुक केले आहे. भारतात अनेकांकडून त्याचे अनुकरण केले जात आहे. या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण आप मध्ये प्रवेश केला, अशी माहिती वेळ्ळीतील परिचित व्यक्तिमत्व डॉ. सुयोग अरावत्तीगी यांनी दिली. त्यांच्या प्रवेशामुळे वेळ्ळीळीत आपची पकड मजबूत झाली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केजरीवाल यांनी शिक्षणाबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात केलेले अमुलाग्र बदल हे प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, सरचिटणीस गेर्सन गोम्स आणि वेळ्ळी विधानसभा प्रभारी क्रूझ सिल्वा यांची उपस्थिती होती. डॉ. अरावत्तीगी हे आयएमए गोवाचे माजी अध्यक्ष असून गेली 22 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात आहेत.
कोविड च्या दुसऱया लाटे दरम्यान गोवा सरकार निद्रावस्थेत होते, त्यावेळी दिल्ली सरकार दिल्लीसह शेजारीच्या राज्यांतील येणाऱया लाखो रुग्णांचे प्राण वाचवत होते. आप सरकारच्या होम आयसोलेशन मॉडेलने अनेकांचे प्राण वाचवले परिणामी हॉस्पिटल वरील ताण कमी झाला. याऊलट सावंत सरकारची निक्रियता व ऑक्सजिनच्या तुटवडय़ामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. कोविड व्यवस्थापनाचा देखील बोजवारा उडाला. हे सर्व संपविण्याची गरज असून केजरीवाल मॉडेल गोव्यात आणणे हा त्यावर एकमेव मार्ग आहे. आप हा एकमेव पक्ष आहे जो वर्तमान स्थिती बदलू शकतो. एकही आमदार नसतानाही नागरिकांना अन्न, ऑक्सिमीटर, ऑक्सजिन सिलेंडर आणि औषधाची मदत करताना दिसले. म्हणूनच मला आप सोबत काम करायचे आहे आणि माझ्या मतदारसंघाची आणि राज्याची सेवा करायची आहे, असे डॉ. अरावत्तीगी म्हणाले.
सरचिटणीस गेर्सन गोम्स, उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनीही विचार मांडले.