पेडणे (प्रतिनिधी )
पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी मगो पक्षाचा राजीनामा देऊन ते आज रविवारी भाजाप पक्षात प्रवेश करणार होते. मात्र रविवारी अमावास्या असल्याने त्यांचा प्रवेश टळला असून आता सोमवार दि. 3 जानेवारी रोजा भाजपात प्रवेश निश्चित झाला आहे. आर्लेकर यांच्या प्रवेशाची जय्यत तयारी सुरू असून मगोचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन त्यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रवीण आर्लेकर हे भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती. पेडणे मतदारसंघात भाजपची उमेदवारी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, प्रवीण आर्लेकर की राजन कोरगावकर यांना मिळणार, याबाबत कार्यकर्ते आणि मतदारांत उलट सुलट चर्चा सुरू होती. पेडणे भाजप मंडळाची बैठक शनिवारी म्हापसा येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावाडे व इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पक्षाने प्रवीण आर्लेकर यांना पेडणेत उमेदवारी देण्याच्या निर्णयाला मंडळाने ग्रीन सिग्नल दिला. यामुळे आर्लेकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
पक्षाचा निर्णय आम्हाला मान्यः गावस
पेडणे भाजप मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. बैठकीत प्रवीण आर्लेकर यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली. पक्षाने पेडणे मतदारसंघात आम्हाला भाजप उमेदवार म्हणून प्रवीण आर्लेकर यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यास ते आम्हाला मान्य आहे. पक्षाच्या निर्णयाला आम्ही बांधिल असून आर्लेकर यांना आम्ही निवडून आणू, असे पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी सांगितले.
प्रवीण आर्लेकरांचा विजय निश्चितः रमेश सावळ
पेडणे मतदारसंघात गेली दोन वर्षे प्रवीण आर्लेकर यांचे कार्य सुरु आहे. त्यांचे कार्य पाहून त्यांच्याकडे मतदारांचा कल वाढत आहे. ते मगो पक्षातून भाजपमध्ये
प्रवेश करणार आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विजयासाठी आपण काम करणार आहोत. भाजपचे इतरही कार्यकर्ते हे प्रवीण आर्लेकर यांच्या बाजूने आहेत. कार्यकर्ते पक्षाने घेतलेल्या भुमिकेचे स्वागत करुन त्यांना निश्चित विजयी करतील, असा विश्वास तोरसेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य, तथा ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश सावळ यांनी व्यक्त केला.
भाजपने प्रवीण आर्लेकर यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे कोणती भुमिका घेतात याकडे बाबू समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.