प्रतिनिधी/ बेळगाव
कंग्राळी खुर्द येथील दीपा तबला वादन विद्यालय, संगीत आणि सांस्कृतिक कला मंच यांच्यावतीने नववर्षाची पहाट ही सुमधूर भजनाने करण्यात आली. अलीकडे नववर्षाची पहाट मद्य ढोसून किंवा मटणावर ताव मारून होताना दिसत आहे. त्याला फाटा देऊन नवीन पायंडा पाडण्यासाठी शंकर मुतगेकर यांनी गेली पाच वर्षे हा उपक्रम सुरू केला आहे. यावषीसुद्धा हा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून रुक्मिणी निलजकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. मंदिरामधील माऊलीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुतगेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम व द्वितीय क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम तसेच भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, वारकरी मंडळ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.