क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेने आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात नागराज बसीडोनीने संतोष पडोलकर याचा चौथ्या मिनिटाला एकेरी हाताचा कस चढवत चित करून उपस्थित कुस्तीशौकनांची मने जिंकली.
आनंदवाडी आखाडय़ात झालेल्या या मैदानात कर्नाटक केसरी नागराज बसीडोनी व महाराष्ट्र चॅम्पियन संतोष पडोलकर पुणे ही प्रमुख कुस्ती माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, डॉ. गणपतराव पाटील, सतिश पाटील, राम पवार, मारूती घाडी आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला नागराजने संतोषवर दुहेरी पट काढून ताबा मिळविला. पण संतोषने त्यातून सुटका करून घेतली. तिसऱया मिनिटाला नागराजने एकेरी पट काढून संतोषला खाली घेत मानेवर घुटना ठेवून घुटना फिरविण्याचा प्रयत्न केला. पण एकेरी हाताचा कस चढवित संतोषला आसमान दाखवून उपस्थित 10 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
एमईजी सेंटरचा आकाश घाडी व आंतरराष्ट्रीय चॅम्पियन सौरभ पाटील राशिवडे यांची दुसऱया क्रमांकाची कुस्ती बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, मि. इंडिया सुनील आपटेकर, बाळाराम पाटील, विलास घाडी आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱया मिनिटाला आकाशने एकेरी पट काढत सौरभला खाली घेऊन चित करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून सौरभने सुटका करून घेतली. सौरभने टाच मारून आकाशला खाली घेत मोळी बांधण्याचा प्रयत्न केला. पण आकशने चलाखीने सुटका करून घेतली. सहाव्या मिनिटाला सौरभने एकेरी पट काढीत आकाशला खाली घेऊन एकलांगी भरून हाताचा कस चढवून चित करण्याचा प्रयत्न करत असताना पंचांनी 90 अंशाच्या वर हात खेचल्याने कुस्ती थांबविण्याची सूचना केली असता बेसावध आकाशला चित केल्याचे सांगून मैदान सोडले. या वादग्रस्त निर्णयामुळे थोडावेळ कुस्ती शौकीनात तणाव निर्माण झाला. पण शेवटी पंचांनी ही कुस्ती बरोबरीत राहिल्याचे सांगितले.
पवन चिकदिनकोप्प व कीर्तीकुमार बेनके ही तिसऱया क्रमांकाची कुस्ती डाव प्रतिडावाने रंगली पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती रोहित पाटील कंग्राळी व सिद्धारूढ धारवाड ही कुस्ती बरोबरीत राहिली. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत किरण अष्टगीने गुणावर विजय मिळविला. सात व आठ क्रमांकाच्या कुस्त्या वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आल्या. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत महादेव इटगीने संतोष मेत्रीचा एकचाक डावावर विजय मिळविला. संकल्प एळवेने लक्ष्मण मुन्नोळीवर विजय मिळविला. प्रथमेश हट्टीकर कंग्राळी, कुमार रामदुर्ग, पृथ्वीराज पाटील, यश चौगुले, पार्थ पाटील कंग्राळी, सुरज कडोली, प्रज्वल मच्छे, पवन कंग्राळकर येळ्ळूर, कल्लाप्पा धारवाड, नितीन शिंदमवहळ्ळी, किसन चौगुले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
गदेच्या कुस्तीत नंदेश इटगीने परशराम धारवाडचा खेमी डावावर पराभव करून मानाची गदा पटकाविली. मेंढय़ाच्या कुस्तीत ओम घाडीने दर्शन किणयेचा एकलांगीवर तर श्री घाडीने ओम कोईघोडे राशिवडे याचा घुटना डावावर पराभव करून मेंढय़ाचे बक्षीस मिळवले. ओम पाटील मुतगा याने दर्शन किणयेचा एकचाक डावावर पराभव केला. या कुस्तीसाठी राम पवार, बाळाराम पाटील, नारायण येळ्ळूर, कृष्णा पाटील, शिवाजी कडोली, प्रशांत पाटील, पिराजी मन्नोळकर, नारायण कडोली, बसवराज आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले. मैदान यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती कुस्तीगिर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.