लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्राचा उपक्रम : 80 हून अधिक जणांनी केले रक्तदान
प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्राच्यावतीने रविवारी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या शिबिरामध्ये 80 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करून रक्तदात्यांनी अनोख्या पद्धतीने मराठी भाषेची अस्मिता व्यक्त केली. शिबिराचे उद्घाटन डॉ. माधव प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. माधव प्रभू म्हणाले, एकवेळ रक्तदान केल्यामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते. रक्तामध्ये असणाऱया पेशी व इतर घटक स्वतंत्र करून वेगवेगळय़ा व्यक्तींना ते वापरले जाऊ शकते. रक्तदाता हा एकप्रकारे देवच असतो. त्याने दिलेल्या रक्तामुळे जीव वाचू शकतो. डॉक्टर दररोज एका रुग्णाचा जीव वाचवत असतात. परंतु सर्वसामान्यांनाही रक्तदान करून एखाद्याला जीवदान देण्याची ही संधी असते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर ‘लोकमान्य’चे संचालक गजानन धामणेकर, सुबोध गावडे, अनिल चौधरी, अजित गरगट्टी, केएलई ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. विठ्ठल माने, इनचार्ज डॉ. श्रीकांत विरगी उपस्थित होते.
लोकमान्य सोसायटीचे संचालक सुबोध गावडे यांनी प्रथमतः रक्तदान केले. त्यानंतर लोकमान्य समुहातील सदस्य व इतर नागरिकांनी रक्तदान केले. केएलई ब्लड बँकेने रक्त संकलन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव यांनी केले. कोरोनामुळे मागील दोन वर्षात रक्तदान शिबिरे झाली नाहीत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असताना लोकमान्य सोसायटीने तसेच सामाजिक सांस्कृतिक केंद्राने राबविलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार केएलई ब्लड बँकेकडून काढण्यात आले.
यावेळी लोकमान्यचे रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी, पीआरओ राजू नाईक, नितीन कपिलेश्वरी, निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, अशोक केळकर, मकरंद बापट, परशराम माळी, केएलई ब्लड बँकेचे कर्मचारी अर्जून पाटील, प्रकाश लाळी, शोभा बेळवंकीमठ, स्वाती यासह इतर उपस्थित होते.