हिमाचलात भाजपला धक्का, आसाम-पश्चिम बंगालमध्ये सत्ताधाऱयांनी राखले गड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चौदा राज्यांमधील 3 लोकसभा आणि 30 विधानसभा पोटनिवडणुकांचे संमिश्र चित्र समोर आले आहे. तथापि, हिमाचल प्रदेशात 3 विधानसभा आणि 1 लोकसभा निवडणूक जिंकून काँगेसने भाजपला झटका दिला आहे. आसाममध्ये भाजप आणि त्याच्या मित्रपक्षाने सर्व पाच विधानसभा जागा तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँगेसने सर्व चार विधानसभा जागा जिंकून आपले वर्चस्व राखले.
लोकसभेसाठी पोटनिवडणुका हिमाचल प्रदेशात मंडी, दादरा-नगरहवेली हा केंद्रशासित प्रदेश आणि मध्यप्रदेशातील खांडवा येथे पार पडल्या होत्या. यापैकी हिमाचल प्रदेशात दिवंगत मुख्यमंत्री आणि काँगेसचे नेते वीरभद्रसिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंग यांनी चुरशीच्या लढतीत भाजपचा 9 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे ही जागा भाजपला गमवावी लागली. मध्यप्रदेशातील खांडवा येथे भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी काँगेसचे राजनारायणसिंग पूर्णी यांचा 81 हजारांपेक्षा काही अधिक मतांनी पराभव करुन ही जागा पक्षाकडेच राखली. दादरा-नगरहवेली येथे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजपचे महेश गाबित यांचा 52 हजार मतांनी पराभव केला. अशा प्रकारे शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर प्रथमच लोकसभा निवडणूक जिंकली आहे.
विधानसभांमध्ये संमिश्र चित्र
आंध्र प्रदेश (1), आसाम (5), बिहार (2), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (3), कर्नाटक (2), मध्यप्रदेश (3), महाराष्ट्र (1), मेघालय (1), मिझोराम (1), नागालँड (1), राजस्थान (2), तेलंगणा (1) आणि पश्चिम बंगाल (4) अशा 14 राज्यांमध्ये 29 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यांचे परिणाम काही ठिकाणी सत्ताधाऱयांसाठी धक्कादायक तर इतरत्र सर्वसामान्य असल्याचे दिसून येते.
हिमाचल प्रदेश
या राज्यातील सर्व तीन जागांवर काँगेसचा विजय झाला आहे. अक्री मतदारसंघात काँगेसचे संजय यांनी भाजपचे रतनपाल यांचा 3000 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. फतेपूर मतदारसंघातून काँगेसचे भवानीसिंग यांनी भाजपचे उमेदवार बलदेव ठाकूर यांचा 18 हजार मतांनी पराभव करुन निवडून आले. तर जुब्बाल कोटखाई येथे काँगेसचे रोहीत ठाकूर यांनी भाजपच्या मीनल सेराईक यांचा 4 हजार मतांनी पराभव केला. या राज्यात काँगेसने भाजपची एक जागा खेचली.
आसाममध्ये भाजपचा मोठा विजय
आसाममध्ये सत्ताधारी भाजप आणि त्याचा मित्रपक्ष युपीपी (युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल) यांनी सर्व पाच जागा जिंकल्या आहेत. भाजपचे उमेदवार फणिंदर तालुकदार यांनी भबानीपूर येथून काँगेसचे शैलेंद्र दास यांचा 36 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. गोसाईगाव येथे युपीपीचे जिरोन बासुमतारी यांनी काँग्रेसचे जोवेल तुडू यांचा 28,500 हून अधिक मतांनी पराभव केला, मरियानी मतदारसंघात भाजपच्या रुपज्योती कुर्मी यांनी लुहित कोनवार (काँगेस) यांना 40 हजारांहून अधिक मतांनी हरविले. तामुलपूर मतदारसंघातून युपीपीचे जोवेल डायमारी यांनी अपक्ष गणेश काचेरी यांना 55 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले. तर थोवरा मतदारसंघात भाजपचे सुशांत बोरगोहाईन यांनी अपक्ष मनोरंजन कोनवार यांच्यावर 30 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने मात केली.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल
पश्चिम बंगालमध्ये सर्व चार विधानसमा पोटनिवडणुका जिंकून तृणमूल काँगेसने आपला गड कायम राखला आहे. दिनहाटा मतदारसंघात तृणमूलचे उदयन गुहा यांनी भाजपचे अशोक मंडल यांना तब्बल 1 लाख 70 हजारांहून अधिकच्या प्रचंड मताधिक्क्याने पराभूत केले. गोसाबा मतदारसंघात तृणमूलचे सुब्रतो मोंडल यांनी भाजपचे पलाश राणा यांना 1 लाख 42 हजारांहून अधिक मतांनी हरविले. खरदाहा मतदारसंघात तृणमूलच्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी भाजपचे जॉय दास यांना 93 हजारांहून अधिक मतांनी तर संतीपूर येथे तृणमूलचे ब्रजकिशोर गोस्वामी यांनी भाजपचे निरंजन बिस्वास यांना 64 हजारांहून अधिक मतांनी हरविले.
बिहारमध्ये नितीशकुमारांचे वर्चस्व
बिहारच्या दोन पैकी दोन जागा मिळवून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाने वर्चस्व कायम राखले आहे. कुशेश्वर अस्थान या मतदारसंघात संजदचे अमन भूषण हजारी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे गणेश भारती यांना 13 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले. तारापूर मतदारसंघात संजदचे राजीव कुमार सिंग यांनी राजदचे अरुण कुमार यांना 3,700 हून अधिक मतांनी मात दिली.
आंध्र, राजस्थान, मध्यप्रदेश
आंध्र प्रदेशात बडवेल मतदारसंघात वायएसआर काँगेसच्या दासरी सुधा यांनी भाजपचा 96 हजार मतांनी पराभव केला. राजस्थानात धारियावाड आणि बल्लभपूर या दोन्ही जागा जिंकून काँगेसने प्रभाव कायम राखला. मध्यप्रदेशात 3 पैकी दोन जागा भाजपने जिंकल्या आहेत. जोबाट येथे 6 हजारांहून अधिक तर पृथ्वीपूर येथे 16 हजारांहून अधिक मतांनी भाजपचा विजय झाला तर काँगेसने रायगावची जागा 12 हजारांहून अधिक मतांनी स्वतःकडेच राखली. मध्यप्रदेशात भाजपने जोबाट हा मतदारसंघ काँगेसकडून आपल्याकडे खेचला आहे. गेल्या 70 वर्षांमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली ही जागा भाजपने केवळ दोनदा जिंकली आहे.
याशिवाय मिझोराम, नागालँड, महाराष्ट्र, मेघालय, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील पोटनिवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱयांनी वर्चस्व राखले आहे. मात्र कर्नाटकात हानगलची जागा काँगेसने भाजपकडून खेचली आहे तर सिंदगीची जागा भाजपने निजदकडून स्वतःकडे घेतली असल्याचे दिसून आले.
बॉक्स
तेलंगणात भाजप
तेलंगणा राज्यात भाजपने सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला धक्का दिला आहे. हुजूराबाद मतदारसंघात भाजपचे एटाला राजेंद्र यांनी तेलंगणा राष्ट्र समितीचे गेलू श्रीनिवास यादव यांचा 20 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. भाजपने प्रथमच ही जागा जिंकून तेलंगणातील आपला विस्तार वाढविला आहे.
बॉक्स
दृष्टीक्षेपात पोटनिवडणुकांचे परिणाम
लोकसभा
राज्य विजयी पक्ष पराभूत पक्ष
दादरा-नगरहवेली शिवसेना भाजप
हिमाचल प्रदेश काँगेस भाजप
खांडवा भाजप काँगेस
विधानसभा (महत्त्वाची राज्ये)
राज्य विजयी पक्ष पराभूत पक्ष
आसाम भाजप, युपीपी (5) काँगेस
पश्चिम बंगाल तृणमूल (4) भाजप
हिमाचल प्रदेश काँगेस (3) भाजप
बिहार संजद (2) राजद
राजस्थान काँगेस (2) भाजप
तेलंगणा भाजप (1) तेलंगणा राष्ट्र समिती
महाराष्ट्र काँगेस (1) भाजप
मध्यप्रदेश भाजप (2) काँगेस (1)