आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध एकतर्फी विजय, रबाडा सामनावीर
वृत्त संस्था/ अबु धाबी
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीच्या समीप पोहोचला आहे. या स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या सामन्यात भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 6 गडय़ांनी दणदणीत पराभव केला.
मंगळवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश डाव 18.2 षटकात 84 धावांत आटोपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 13.3 षटकात 4 बाद 86 धावा जमवित हा सामना 6 गडय़ांनी जिंकला. या स्पर्धेत आता गट-1 मध्ये दक्षिण आफ्रिकेने चार पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यांचा आता प्राथमिक गटातील शेवटचा सामना इंग्लंड संघाविरुद्ध 6 नोव्हेंबरला होणार आहे. या गटात इंग्लंडने आपले चारही सामने जिंकून पहिले स्थान भक्कम केले आहे.
दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज रबाडा, नॉर्त्झे त्याचप्रमाणे शम्सी यांनी बांगलादेशच्या फलंदाजांना केवळ 18.2 षटकात 84 धावांत गुंडाळले. बांगलादेशच्या डावात लिटॉन दासने 36 चेंडूत 1 चौकारांसह 24, मेहदी हसनने 25 चेंडूत 1 षटकार आणि2 चौकारांसह 27 तसेच शमीम हुसेनने 20 चेंडूत 11, सलामीचा नईमने 1 चौकारांसह 9 धावा जमविल्या. बांगलादेशच्या चार फलंदाजांना आपले खाते उघडता आले नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडाने 20 धावांत 3, नोर्त्झेने 8 धावात 3, शम्सीने 21 धावात 2 तर प्रेटोरियसने 11 धावांत 1 गडी बाद केला. या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन खेळू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये व्हॅन डेर डय़ुसेनने 27 चेंडूत 2 चौकारांसह 22, डी कॉकने 15 चेंडूत 3 चौकारांसह 16, हेन्ड्रिक्सने 1 चौकारांसह 4, कर्णधार बवूमाने 28 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 31, मिलरने 1 चौकारांसह नाबाद 5 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 1 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे तस्कीन अहमदने 18 धावांत 2 तर मेहदी हसन आणि अहमदने प्रत्येकी एक गडी बाद केला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ गट-1 गुणतक्त्यात दुसऱया स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश- 18.2 षटकात सर्वबाद 84 (दास 24, मेहदी हसन 27, मोहम्मद नईम 9, शमीम हसन 11, रबाडा 3-20, नोर्त्झे 3-8, शम्सी 2-21, प्रिटोरियस 1-11).
दक्षिण आफ्रिका- 13.3 षटकात 4 बाद 86 (बवूमा नाबाद 31, मिलर नाबाद 5, व्हॅन डेर डय़ुसेन 22, डी कॉक 16, हेड्रिंक्स 4, मार्करम 0, तस्कीन अहमद 2-18, मेहदी हसन 1-19, अहमद 1-22).