वृत्तसंस्था/ टय़ुरिन
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी येथे झालेल्या सामन्यात युवेंट्सने डायनॅमो किव्हचा 3-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात युवेंट्स संघाकडून खेळताना पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डोने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीतील 750 व्या गोलाची नोंद केली. त्याचप्रमाणे या स्पर्धेत फ्रान्सची स्टेफनी प्रॅपर्ट ही पहिली फुटबॉल पंच म्हणून नोंद झाली आहे.
या सामन्यात युवेंट्सतर्फे फेड्रिको चिसाने पहिला गोल नोंदविला. या स्पर्धेतील चिसाचा हा पहिला गोल आहे. त्यानंतर अल्वेरो मोराटाने गोल नोंदवून युवेंट्सला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ख्रिस्टीयानो रोनाल्डोने युवेंट्सचा तिसरा गोल नोंदवून डायनामो किव्हचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. 35 वर्षीय रोनाल्डोच्या फुटबॉल कारकीर्दीतील हा 750 वा गोल ठरला. त्याने आपल्या फुटबॉल कारकीर्दीत रियल माद्रीद संघाकडून खेळताना 450 गोल, मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना 118 गोल, पोर्तुगाल संघाचे प्रतिनिधीत्व करताना 102 गोल तसेच युवेंट्स संघाकडून खेळताना 75 आणि स्पोर्टिंग क्लबकडून खेळताना 5 गोल नोंदविले आहेत.
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत युवेंट्स संघाने ग गटातून आपली पात्रता सिद्ध केली असून डायनॅमो किव्हचे आव्हान संपुष्टात आले आहे. युवेंट्सचा संघ या स्पर्धेच्या गुणतक्त्यात 12 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. बार्सिलोना संघ 15 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.