मडगावात झाले अंत्यसंस्कार
प्रतिनिधी / मडगाव
हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड न करणारे, मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला पाहिजे यासाठी दिवस-रात्र झटणारे भारतीय भाषा सुरक्षा मंच व भारत माता की जय संघटणेचे गोवा राज्यप्रमुख अवधुत रामचंद्र कामत (64) यांचे काल बुधवारी कोरोनामुळे मडगावच्या एका खासगी हॉस्पिटलात निधन झाले. त्याच दिवशी मडगाव हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याच्या पश्च्यात पत्नी : श्यामल (निवृत्त मुख्याध्यापिका न्यू वाडे इंग्लीश हायस्कूल, वास्को), पूत्र : अक्षय व कौशिक असा परिवार आहे.
अवधुत कामत यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना प्रथम मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तेथून नतंर मडगावच्या एका खासगी हॉस्पिटलात नेण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अवधुत कामत यांचे अकस्मात निधन झाल्याने सुभाष वेलिंगकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अवधुत कामत हे सिद्धांत न तत्वासाठी, सरकारी सत्तेची आमिषे व निर्घृण दबावांना कधीच बळी पडले नव्हते. ते भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि ‘भारतमाता की जय’चे राज्याचे नेतृत्व करत होते. त्यामुळे त्यांना अफाट प्रवास करावा लागला. अद्याप खूप काही करायचे शिल्लक असतानाच त्याचे जाणे आपल्यासाठी धक्कादायक असल्याचे श्री. वेलिंगकर यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
कोंब-मडगाव येथे राहणारे अवधुत कामत हे पेशाने शिक्षक होते. मडगावच्या दामोदर इंग्लीश हायस्कूलमध्ये ते विद्यादान करायचे. शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यावर त्यांनी हिंदू जनजागृतीचे कार्य आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यात स्वताला वाहून घेतले होते.