वृत्तसंस्था/ बेंगळूर
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या बेंगळूर खुल्या 500 दर्जाच्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या प्रजनीश गुणेश्वरनचे आव्हान दुसऱया फेरीतच झेकच्या टॉपसीडेड जेरी व्हेसेलीकडून संपुष्टात आले.
या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या दुसऱया सामन्यात झेकच्या टॉपसीडेड व्हेसेलीने भारताच्या प्रजनीश गुणेश्वरनचा 3-6, 6-2, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. व्हेसेलीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना फ्रान्सच्या सहाव्या मानांकित कोकेडशी होणार आहे. कोकेडने दुसऱया फेरीतील सामन्यात मॅक्स प्युरसेलवर 6-4, 3-6, 6-2 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.
या स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या तीन जोडय़ांना हार पत्करावी लागली. दरम्यान, साकेत मिनेनी आणि रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीने उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्यांचे प्रतिस्पर्धी कॅनडाचा डाएझ आणि टय़ुनिशियाचा जेझारी यांनी माघार घेतल्याने मिनेनी आणि रामकुमार यांना पुढे चाल मिळाली. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात तुर्कीच्या सेम लिकेलीने रशियाच्या डॉनस्कॉयवर 2-6, 6-3, 7-5, फ्रान्सच्या मुल्लेरने बल्गेरियाच्या कुझमेनोव्हवर 7-6(7-4), 6-4 अशी मात केली.