सिरम कोविशिल्ड वॅक्सीनच्या 10,260 लस उपलब्ध : उद्या लसीकरणाला प्रारंभ
- जिल्हा रुग्णालय, कणकवली, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय ही तीन केंद्रे निश्चित
- लसीकरणाचा प्रारंभ दिनी 300 जणांना देणार कोरोना लस
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
संपूर्ण जगभर हाहाकार उडवून देणाऱया कोरोना विषाणूवर लस कधी येणार, याकडे सिंधुदुर्गवासीयांचेही लक्ष लागून होते. ती प्रतीक्षा आता संपली आहे. बहुप्रतिक्षित कोरोनावरील लस अखेर जिल्हय़ात गुरुवारी दाखल झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्हय़ाला सिरम कोविशिल्ड वॅक्सीनची 10,260 लस उपलब्ध झाली आहे. 16 जानेवारीला लसीकरणाला प्रारंभ होणार असून पहिल्या दिवशी तीन केंद्रांवर 300 जणांना लस दिली जाणार आहे.
लस देण्यासाठी जिल्हा रुग्णालय, कणकवली आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय ही तीन केंदे निश्चित करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर शंभरजणांना लस दिली जाणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती देण्यात आली.
कोरोना लस आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथे वितरण केंद्रावर वॅक्सीन व्हॅन पाठविण्यात आली होती. सायंकाळी उशिरा व्हॅन जिल्हय़ात दाखल झाली. कोल्हापूर येथून वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी हे जिल्हय़ात लस घेऊन दाखल झाले. त्यानंतर सिंधुदुर्गनगरी येथील औषध भांडारमध्ये शीतगृहामध्ये सुरक्षितरित्या लसींची साठवणूक करण्यात आली आहे. लस जिल्हय़ात दाखल झाली, त्यावेळी जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. संदेश कांबळे, संतोष व्हटकर, औषध भांडार येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लसीकरणासाठी आवश्यक सर्व सामग्रीबाबतची सर्व तयारी तीनही लसीकरण केंद्रांवर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका अशा प्रंटलाईन दहा हजार अधिकारी व कर्मचाऱयांना कोरोना लस दिली जाणार आहे. 16 जानेवारीला तीनही लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 जणांना लस दिली जाणार आहे. जिल्हय़ात दाखल झालेल्या 10 हजार 260 लसींमधून 4500 लाभार्थींना लस दिली जाणार आहे. ही लस देताना तीनही लसीकरण केंद्रांवर यापूर्वी नोंदणी केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी कोविड प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. लसीकरण सुरुवातीच्या दिवशी त्यांना लस दिल्यानंतर अर्धा तास थांबवून देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. त्यानंतरच त्यांना घरी पाठवले जाणार आहे. लस दिल्यानंतर काही रिऍक्शन आल्यास तात्काळ उपचार करण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे. प्रत्येकाला दोन डोस दिले जाणार असून दुसरा डोस 28 दिवसांनंतर दिला जाणार आहे.