आबा दळवी यांचा सपत्नीक विलवडे वासियांच्यावतीने सत्कार
ओटवणे / प्रतिनिधी:
काँगेस पक्षाने संघटनेत दिलेल्या प्रत्येक पदावर जबाबदारी व इमानदारीने काम करून पक्षाचा विश्वास सार्थ ठरविला. तसेच ग्रामदैवत माऊलीचा कृपाशिर्वाद आणि काँगेस पक्षाचे पाठबळ यामुळेच आपण राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपण यशस्वी होउ शकलो. गेली ३५ वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना विलवडेवासियांची कौतुकाची थाप आपल्याला नेहमीच प्रोत्साहन देते. त्यामुळे विलवडेवासियांसाठी यापुढेही सर्वतोपरी योगदान देण्याची ग्वाही विलवडे गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी रामचंद्र उर्फ आबा दळवी यांनी दिली.
आबा दळवी यांच्या विलवडे निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रपती पोलिस पदक विजेते परशुराम राणे, माजी उपसभापती कृष्णा सावंत, सरपंच रावजी दळवी, माजी सरपंच बाळकृष्ण दळवी, मोहन दळवी, प्रकाश दळवी, सोनू दळवी, जयप्रकाश दळवी, दिगंबर दळवी, शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते प्रमोद दळवी, वामन दळवी, नंदकिशोर दळवी, परेश धर्णे, विश्राम दळवी, मनोज दळवी, कालिदास दळवी, श्रीराम सावंत, आत्माराम दळवी, बाबा दळवी, प्रभाकर दळवी, अमृत सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील पूरग्रस्तांना पुन्हा ४५ हजाराची मदत
तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी भर वस्तीत शिरून नुकसान झालेल्या विलवडे गावातील पूरग्रस्तांना आबा दळवी यांनी यापूर्वीच अडीच लाखांची मदत केली होती. मंगळवारी गावी आल्यानंतर त्यांनी गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी त्यांनी गावातील उर्वरित ९ पूरग्रस्तांना ४५ हजारांची मदत केली.