‘गोमंतकीयविरोधी सरकारच्या पाडावासाठी आघाडीस तयार’
प्रतिनिधी / मडगाव
2017 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाला बाजूला ठेवून आपण काँग्रेससमवेत आघाडी सरकार सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न केले होते हे सत्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्या विधानातून स्पष्ट होते. आपण हेही स्पष्ट करतो की, 2022 मध्ये या गोमंतकीयविरोधी सरकारचा पाडाव करण्यासाठी आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पटेल यांनी रविवारी पणजीत झालेल्या पक्षाच्या सभेत 2017 साली निवडणुकीच्या पूर्वी युती करण्यासाठी दिल्लीत आपल्या निवासस्थानी बैठक ठेवली होती आणि या बैठकीस गोवा फॉरवर्डचे सरदेसाई उपस्थित राहिले होते असे सांगितले होते. सरदेसाई 24 तास आपल्या घरी होते. मात्र काँग्रेस नेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही युती होऊ शकली नाही, असे पटेल यांनी नजरेस आणून दिले होते.
2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव हे एकमेव उमेदवार, तर गोवा फॉरवर्डचे तीन आमदार निवडून आले. काँग्रेस पक्षाला 17 जागा मिळाल्या. तिन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या मिळून बहुमतासाठीचा 21 चा आकडा गाठता येत असल्याने आम्ही राष्ट्रवादी व गोवा फॉरवर्डने सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला पाठिंबा दर्शविला होता. सकाळी 1?1 वा. अशी राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ निश्चित करण्यात आली होती. नंतर ही वेळ दुपारी 1 वा. ठरविण्यात आली. नंतर ती तासातासाने वाढत गेली व काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विजय सरदेसाई सायंकाळी 5 वा. भाजपाला पाठिंबा देण्यास गेले, असे पटेल यांनी या सभेत सांगितले होते.
पटेल यांच्या या विधानावर सरदेसाई यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली असून 2022 च्या निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.