नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापनाने युवा खेळाडूंवर नेहमीच भरवसा दाखवला आहे आणि या खेळाडूंनी देखील तो विश्वास सार्थ ठरवला. आता रिषभ पंत देखील नेतृत्वाच्या मिळालेल्या संधीचे सोने करुन दाखवेल, असा दृढ आत्मविश्वास या संघाचे साहायक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी व्यक्त केला. प्रवीण आमरे दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा दिल्ली कॅपिटल्स संघात परतले आहेत. मागील हंगामात जेते ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी त्यांनी हाय परफॉर्मन्स कोच म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर यंदा दिल्ली कॅपिटल्स प्रँचायझीने त्यांना पुन्हा एकदा पाचारण केले. रिकी पाँटिंग दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवत आहे.
मागील हंगामात दिल्लीने उपजेतेपदापर्यंत मजल मारली होती. यंदा त्यांचा जेतेपदावर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने प्रवीण आमरे यांना करारबद्ध केले. आमरे हे 2014 ते 2019 या कालावधीत दिल्ली संघाचे हेड टॅलेंट काऊंट राहिले आहेत.
‘दिल्ली व्यवस्थापनाने संधी दिलेले पृथ्वी शॉ, रिषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासारखे खेळाडू आयपीएलमध्ये तर चमकले आहेतच. पण, त्याही शिवाय, त्यांनी जागतिक क्रिकेटवर देखील अधिराज्य गाजवले आहे’, असे आमरे बुधवारी म्हणाले. 1992 साली दरबानमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पणात शानदार शतक झळकावणाऱया आमरे यांनी साहायक प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी केवळ आयपीएल स्पर्धेपुरती मर्यादित नसेल, असेही म्हटले. ऑस्ट्रेलियातील खराब प्रदर्शनामुळे एकवेळ संघातून बाहेर फेकल्या गेलेल्या पृथ्वी शॉला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दर्जेदार पुनरागमन करण्यासाठी आमरे यांनी मोलाचा वाटा उचलला होता.