भाजप प्रवेशप्रसंगी सुरंगी हरमलकर यांचे प्रतिपादन, मतदारसंघात भाजपने एक चांगला उमेदवार दिला
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे मतदारसंघात प्रवीण आर्लेकर यांनी गेली अडीच वर्षे गोरगरीब जनतेसाठी केलेले कार्य पाहून आपण आज भाजप पक्षात प्रवेश करत असून आर्लेकर यांचा विजय निश्चित आहे. भाजपने एक चांगला उमेदवार पेडणे मतदारसांघात देऊन चांगले पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन धारगळच्या माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी सरपंच सुरंगी हरमलकर यांनी पेडणे येथे केले.
पेडणे येथे भाजप प्रवेश करुन पेडणे मतदारसंघाचे भाजापचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांना सुरंगी हरमलकर यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी व्यासपीठावर धारगळचे सरपंच भूषण नाईक, उगवे तांबोसे मोप पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले, विर्नोडा पंचायतीचे माजी सरपंच तथा पंचसदस्य भरत गावडे प्रशांत राव, मंगलदास किनळेकर, व पंच शैलेश परब उपस्थित होते.
यावेळी धारगळच्या माजी पंचसदस्य दिप्तीशा नारोजी, दर्शन नाराजी, समाजसेवक रोहिदास हरमलकर, समाजसेवक उल्हास हरमलकर यांनी यावेळी भाजप पक्षात प्रवेश करत प्रवीण आर्लेकर यांना पाठिंबा दिला.
प्रवीण आर्लेकर हे दूरदृष्टी असलेले नेते
प्रवीण आर्लेकर यांनी आमदार नसताना केलेले कार्य पाहून आम्ही प्रभावित झालो. पेडणेच्या समस्या सोडविण्यासाठी अशा लोकप्रतिनिधीची पेडणेकरांना गरज असून आर्लेकर हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांच्या मागे पेडणे मतदारसंघातील मतदारांनी राहून त्यांना भरघोस मतानी विजयी करावे, असे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरंगी हरमलकर यांनी केले.
भाजपचाच उमेदवार निवडून येणार : रोहिदास हरमलकर
देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजपच राज्यात स्थिरता देऊ शकते. आम्ही गेली तीन वर्षे प्रवीण आर्लेकर यांचे कार्य पाहिले. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. भाजपचे काम हे इतर कुठल्याच पक्षाला जमणार नाही. पक्षाच्या कामामुळेच आज आम्ही भाजप प्रवेश केला असून पेडणे मतदारसंघात प्रवीण आर्लेकर हेच आमदार म्हणून निवडून येणार असल्याचे धारागळ पतसंस्थेचे माजी चेअरमन आणि समाजसेवक रोहिदास हरमलकर म्हणाले.
आर्लेकर यांना वाढता पाठिंबा : भूषण नाईक
पेडणे मतदारसंघात प्रवीण आर्लेकर यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून त्यांचा विजया हा निश्चित आहे. चाळीसही मतदारसंघातून आर्लेकर हे सर्वाधिक मते घेऊन निवडून येणार असा विश्वास धारगळ पंचायतीचे सरपंच भूषण नाईक यांनी व्यक्त केला.
प्रवीण आर्लेकर यांना मिळत असलेला पाठिंबा पाहता त्यांचा विजय हा झालेला आहे. 14 रोजी पेडणेची जनता यावर शिक्कामोर्तब करणार आहे, असे उगवे – तांबोसे- मोप पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले म्हणाले.
समस्या सोडविण्यासाठी निवडून द्या : प्रवीण आर्लेकर
आपण पेडणे मतदारसंघात गेली अडीच वर्षे गोरगरीब जनतेसाठी काम केले. यापेक्षा चांगले कार्य आणि काम आपण आमदार म्हणून निवडून आल्यानंतर करणार. मतदारांनी मला मतदान करुन विजयी करावे असे आवाहन करत मतदारांच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही असे पेडणे मतदारसंघाचे भाजापचे उमेदवार प्रवीण आर्लेकर म्हणाले.