वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्धय़ांना मार्गदर्शन करणारे संचालक इटलीचे राफाएल बर्गमॅस्को यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
50 वर्षीय बर्गमॅस्को यांच्याशी अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनने 2017 मध्ये चार वर्षांसाठी करार केला होता. या कराराचा कालावधी बुधवारी संपणार आहे. तथापि बर्गमॅस्को यांनी आपल्या करारामध्ये मुदतवाढ करण्याबाबतची विचारणा फेडरेशनकडे केली होती. पण गेल्या महिनाभराच्या कालावधीत फेडरेशनकडून कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बर्गमॅस्को यांनी इटलीला परतण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनने बर्गमॅस्को यांना केवळ तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचे ठरवले होते पण बर्गमॅस्को यांनी अल्प मुदतीच्या करारवाढीला नकार कळविला होता. बर्गमॅस्को यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाशी (साई) संपर्क साधला आहे. बर्गमॅस्को हे गुरूवारी मायदेशी (इटली) रवाना होणार आहेत.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या पाच पुरूष आणि चार महिला मुष्टीयोद्धय़ांनी आपला सहभाग दर्शविला होता. पण भारताची लोव†िलना बोर्गोहेन हिने 69 किलो वजन गटात एकमेव कास्यपदक मिळविले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत 9 वर्षांच्या कालावधीत मुष्टीयुद्ध प्रकारात भारताला मिळालेले हे पहिले पदक ठरले. पण इतर स्पर्धकांनी या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्याने बर्गमॅस्को यांना मुदतवाढ देण्यास भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेचे अध्यक्ष अजय सिंग हे उत्सुक नव्हते.