ऑनलाईन टीम / पुणे :
भारतातील इतर पुढारलेल्या धर्मांच्या तुलनेत मुस्लीम धर्मात साक्षरतेचे प्रमाण कमी असून समाजातील वंचित,मागास,अल्पसंख्य समुदायाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे डॉ पी ए इनामदार यांचे कार्य हे अतुलनीय आहे’,असे उद्गार खासदार वंदना चव्हाण यांनी काढले.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२०’ आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या प्रसंगी खा.चव्हाण बोलत होत्या.संस्थेचे सचिव डॉ लतीफ मगदूम अध्यक्ष स्थानी होते.
माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे, बीव्हीजी इंडिया लिमिटेड चे संस्थापक हणमंत गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते जे के सराफ, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, घटस्फोट रोखण्यासाठी समुपदेशनाचे काम करणारे समीर शेख यांना ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले.सन्मान सोहळ्याचे हे बारावे वर्ष होते. हणमंत गायकवाड यांच्या वतीने रवी घाटे यांनी सन्मान स्वीकारला. डॉ पी ए इनामदार यांच्यावरील पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण यावेळी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘राज्यकर्त्यांना,धोरणकर्त्यांना निर्णय घेण्यासाठी साक्षरतेचे प्रमाण हा निकष महत्वाचा असतो.भारतातील साक्षरतेचा अभ्यास केला तर इतर धर्मात साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. मुस्लीम धर्मात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे वंचित, मागास आणि अल्पसंख्य समुदायाचे शिक्षण हे महत्वाचे काम असून डॉ पी ए इनामदार यांनी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या समुदायाच्या शिक्षणाचे केलेले कार्य हे अतुलनीय आहे.या कॅम्पस मध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला जातो. विद्यार्थिनींची वाढती संख्या पाहून समाधान वाटते.