क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद झाल्या होत्या. त्यामुळे गेली दोन वर्षे कोणत्याही स्पर्धा भरविल्या गेल्या नाहीत. अनेक होतकरू खेळाडुंचे भवितव्य कोरोनामुळे वाया गेले. तरी प्राथमिक शिक्षकांनी पुढील काळात विद्यार्थ्यांना खेळाचे चांगले धडे गिरवून पुन्हा पूर्वी प्रमाणे मैदाने भरवावीत असे प्रतिपादन नूतन शारिरीक शिक्षण अधिकारी बी. आर. मठपती यांनी केली.
कॅम्प येथील सेंट ऍन्थोनी शाळेच्या सभागृहात सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे प्राथमिक क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी पीईओ एल. बी. नाईक, जिल्हा सरकारी नौकर संघाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेब्बळी, शहर क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शंकर कोलकार, सचिव एम. आर. अमाशी, राज्य क्रीडा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष रमेश सिंगद, भरत बळ्ळारी, सेंट ऍन्थेनी स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर मेरी आदी उपस्थित होते.
प्रारंभी एन. बी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा व शहर संघटनेतर्फे नूतन क्रीडा शिक्षणाधिकारी बी. आर. मठपती व प्रभारी क्रीडा शिक्षणाधिकारी एल. बी. नाईक यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बी. आर. मठपती यांनी गोळाफेक,
व्हॉलिबॉल, सांघिक कवायती याबद्दलची माहिती व नवीन नियम सर्व क्रीडा शिक्षकांना पटवून दिले. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सचे पालन करून आपण सेतूबांध व इतर सांघिक खेळांची माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाईन मिटद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी एच. व्ही. रोगी, अर्चना देसाई, सिल्वेया डिमेलो, चिदानंद असोदे, अनिल मुगळीकर, सोमशेखर हुद्दार, एस. व्ही. परदेशी, सुनिता जाधव, बापू देसाई, जयसिंग धनाजी, सिद्धार्थ केलगेरी आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते. पुढील काळात सर्व क्रीडा शिक्षकांना अभ्यासात दिलेल्या सांघिक खेळांच्या कार्यशाळा घेण्यात येणार असून, या कार्यशाळेत सर्व शारिरिक शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बी. आर. मठपती यांनी केले.