वार्ताहर/ विजापूर
प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना जिल्हय़ातील बसवन बागेवाडी तालुक्यातीला मुतगी गावात 12 मे रोजी घडली. मृताचे नाव शशीकिरण श्रीशैल रायगोंड असे आहे. तर चंद्रलेखा (वय 27), कुमार पाटील (वय 23) व मंजू कोठे (वय 17) अशी संशयित आरोपींची नावे असून त्यांना कुडगी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, मुतगी येथील शशीकिरण श्रीशैल रायगोंड व त्याची पत्नी चंद्रकला यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. चंद्रकला हिचे एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते. याची माहिती पती श्रीशैलला मिळाली होती. त्यामुळे त्याने याचा जाब पत्नी चंद्रकलाला विचारला होता. त्यातून त्यांचे भांडण झाले. यामुळे पत्नीने आपल्या प्रियकराला सांगितले की, आपल्या अनैतिक संबंधाबाबत पतीला समजले आहे. त्याने तुला भेटण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे त्याचा काटा काढूया, असे सांगितले. याप्रमाणे प्रियकर कुमार पाटील (वय 23) व एक अल्पवयीन मुलगा मंजू कोठे यांनी 12 मे रोजी रात्रीच्यावेळी श्रीशैलच्या घरात प्रवेश केला व तो झोपेत असतानाच पाटील, कोठे व चंद्रलेखाने श्रीशैलची गळा दाबून हत्या केली. सुरूवातीला पोलिसांना चंद्रलेखाने आपल्या पतीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगितले होते. परंतु त्याच्या नातेवाईकांनी त्याची हत्या झाल्याची माहिती दिली. तसेच शवविच्छेदन अहवालामध्ये श्रीशैलचा गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून चंदलेखा, कुमार पाटील, मंजू कोठे या तिघांना अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. कुडगी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. याप्रकरणाच्या तपासात बसवनबागेवाडीचे डीवायएसपी, सीपीआय यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले.