सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
शिक्षक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक तथा समाजसेवक स्व. श्रीधर वेरेकर यांना प्रोबस क्लब, फोंडा व प्रोबस चॅरिटेबल ट्रस्ट फोंडातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या या शोकसभेत बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे म्हणाले की श्रीधर वेरेकरांनी संपूर्ण हयातीत प्रामाणिकपणे कार्य केले. गोव्याच्या मुक्तीलढय़ात स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांचे योगदान खूप मोठे होते. शिक्षकी पेशात त्यांनी चांगले विद्यार्थी घडविले. प्रोबस क्लबच्या कार्यातही त्यांनी मोलाचा वाटा उचलला. यावेळी स्व. वेरेकरांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रोबस क्लबचे अध्यक्ष जयवंत आडपईकर यांनी स्व. श्रीधर वेरेकरांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या पत्रकारितेची प्रशंसा केली. तटस्थपणे लिहिताना त्यांनी कुणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी घेतली आणि समाजाच्या व्यथा पद्धतशीरपणे वृत्तपत्रातून मांडल्या. अशोक केसरकर, रामदास शेटवेरेकर, अविनाश रामनाथकर, दादी तळावलीकर आदींनी यावेळी स्व. श्रीधर वेरेकरांच्या आठवणी सांगितल्या.