वृत्तसंस्था / बेंगळूर
येथे सुरू असलेल्या आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तामिळ थलैवाजने हरियाणा स्टीलर्सचा 45-26 अशा गुणांनी मोठा पराभव केला तर दुसऱया एका अटीतटीच्या सामन्यात जयपूर पिंक पँथरर्सने दबंग दिल्लीची अपराजित घोडदौड रोखताना 30-28 अशा गुणांनी विजय मिळविला.
तामिळ थलैवाज संघाने सामन्याच्या पूर्वार्धात अधिक गुण वसूल केले. सुरूवातीला कर्णधार सुरजीत सिंग आणि सागर यांच्या शानदार कामगिरीमुळे पाचव्या मिनिटाला हरियाणा स्टिलर्सचे सर्व गडी पहिल्यांदा बाद झाले. मध्यंतराला आठ मिनिटे बाकी असताना तामिळ थलैवाजने दुसऱयांदा हरियाणा स्टिलर्सचे सर्व गडी बाद करून 14 गुणांची आघाडी मिळविली. तामिळ थलैवाजच्या सागरने पाच गुण घेत मध्यंतरापर्यंत आपल्या संघाला 24-18 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या उत्तरार्धात तामिळ थलैवाजने आक्रमक चढायाच्या जोरावर हरियाणा स्टिलर्सचे आव्हान 45-26 अशा गुणांनी संपुष्टात आणले.
दबंग दिल्लीच्या घोडदौडीला बेक
दुसऱया सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने दबंग दिल्लीची विजयी घोडदौड रोखली. या अटीतटीच्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने दबंग दिल्लीचा 30-28 अशा गुणांनी पराभव केला. जयपूर पिंक पँथर्सचा नवीनकुमार आणि दबंग दिल्लीचा अर्जुन देशवाल यांनी सुपर 10 गुण पटकाविले. दरम्यान सेऊलकुमारने शेवटच्याक्षणी 8 टॅकल गुण तर दीपक हुडाने 9 रेड गुण नोंदवित जयपूर पिंक पँथर्सला निसटता विजय मिळवून दिला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 12-12 असे बरोबरीत होते मात्र उत्तरार्धातील पाचव्या मिनिटाला दबंग दिल्लीने जयपूर पिंक पँथर्सचे सर्व गडी पहिल्यांदा बाद करत पाच गुणांची आघाडी मिळविली होती. पण त्यांना ही आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. सेऊलकुमारने दीपक हुडाच्या साथीने दबंग दिल्लीचे सर्व गडी बाद करत आघाडी मिळविली होती. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना दबंग दिल्ली चार गुणांनी आघाडीवर होता. पण दीपक हुडाच्या निर्णायक कामगिरीमुळे जयपूर पिंक पँथर्सने दोन गुणांच्या आघाडीसह दबंग दिल्लीचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेतील दबंग दिल्लीचा हा पहिलाच पराभव ठरला.
आजचे सामने
1) हरियाणा स्टीलर्स वि. यूपी योद्धा
वेळ ः रात्री 7.30 वा.
2) दबंग दिल्ली वि. बेंगळूर बुल्स
वेळ ः रात्री 8.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्ने हॉटस्टार.