क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेली गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील धेंपो स्पोर्ट्स क्लब आणि स्पोर्टिंग क्लुब दी गोवा यांच्यातील रोमहर्षक लढत 4-4 अशी बरोबरीत संपली.
या स्पर्धेतील सामना काल जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आला. धेंपो क्लबसाठी उत्तम रायने शानदार हॅट्ट्रिकची नोंद केली तर एक गोल डॅस्मॉन परेराने केला. स्पोर्टिंग क्लुब दी गोवासाठी गौरव काणकोणकरने दोन तर कुणाल कुंडईकर व जॉयलने परेरा यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. मध्यंतराला धेंपो क्लबने 4-2 गोलांची आघाडी घेतली होती.
सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला स्पोर्टिंग क्लुब दी गोवाने गोल नोंदवून आघाडी घेतली. यावेळी मायरन फर्नांडिसच्या क्रॉसवर अकेराज मार्टिंन्सने ताबा घेत दिलेल्या पासवर गौरव काणकोणकरने धेंपोच्या गोलरक्षकाला भेदले व चेंडू जाळीत टोलविला. मात्र, स्पोर्टिंग क्लुब दी गोवाची आघाडी जास्त काळ टिकली नाही.
आठव्या मिनिटाला शॉलम पिरीसच्या पासवर उत्तम रायने स्पोर्टिंगच्या गोलरक्षकाला भेदले आणि बरोबरीचा गोल केला. दहाव्या मिनिटाला धेंपो क्लबने पेनल्टीवर गोल करून परत एकदा आघाडी मिळविली. धेंपोच्या पेद्रू गोन्साल्वीसचा फटका स्पोर्टिंगच्या जॉयलने हाथाळल्याबद्दल मिळालेल्या पेनल्टीवर उत्तम रायने धेंपोच्या दुसऱया गोलाची नोंद केली. लगेच तेराव्या मिनिटाला स्पोर्टिंग क्लुब दी गोवाच्या ऍल्टोन वाझचा हेडर क्रॉसबारला आदळल्याने त्यांची गोल बाद करण्याची संधी हुकली.
धेंपो क्लबच्या आक्रमणांची मालिका त्यानंतरही चालूच राहिली. 27व्या मिनिटाला उत्तम रायच्या पासवर डॅस्मॉन परेराने धेंपोचा तिसरा तर दोनच मिनिटांनी उत्तम रायने धेंपोचा चौथा आणि आपला हॅट्ट्रिकचा गोल केला. दुसऱया सत्रात साठाव्या मिनिटाला धेंपोच्या क्रितिकेश गडेकरला रेफ्रीने रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने त्यांना उर्वरीत तीस मिनिटे दहा खेळाडूंनीशी खेळावी लागली. याचा फायदा स्पोर्टिंग क्लुब दी गोवा घेतला. 2-4 अशा गोलांनी पिछाडीवर असलेल्या स्पोर्टिंग क्लुब दी गोवाने दोन गोल करून सामना 4-4 असा बरोबरीत आणला. प्रथम जॉयल पेरेराने तर 68व्या मिनिटाला गौरव काणकोणकरने आकर्षक गोलाची नोंद केली. शेवटच्या क्षणी स्पोर्टिंग क्लुबच्या फिलीपने विजयी गोल करण्याची सुवर्णसंधी सदोष नेमबाजीमुळे गमविली.