मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला : हत्या झाल्याचा भाजपचा आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या हेमताबादचे आमदार देवेंद्र नाथ रॉय (59 वर्षे) यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला आहे. देवेंद्र नाथ यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. ममता बॅनर्जी सरकारच्या काळात गुंडांचे राज्य सुरू असून कायदा-सुव्यवस्था अपयशी ठरल्याची टीका भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली आहे. तर देवेंद्रनाथ यांच्या खिशातून सुसाइड नोट मिळाली असून यात 3 जणांना जबाबदार धरण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
देवेंद्रनाथ यांचा मृतदेह सोमवारी बिंदल गावात त्यांच्या घरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर एका दुकानासमोर लटकलेल्या स्थितीत सापडला आहे. हत्येनंतर मृतदेह लटकविण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. देवेंद्र नाथ 2016 मध्ये हेमताबाद या राखीव मतदारसंघात माकपच्या तिकीटावर विजयी झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र नाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. माकपमधून बाहेर पडत भाजपमध्ये आलेल्या आमदाराची हत्या करण्यात आली आहे. भाजपमध्ये प्रवेश करणे हा त्यांचा गुन्हा होता का असे प्रश्नार्थक विधान भाजप नेते विजयवर्गीय यांनी पेले आहे.