ऑनलाईन टीम / मुंबई :
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षाणानेच मुंबईत ड्रग्ज व्यवसाय चालत होता, असा आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
मलिक म्हणाले, सध्या तुरुंगात असलेला ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याच्याशी देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. हे दोघे गणपती दर्शनातही सोबत आहेत. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणे आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शयिल हेड म्हणून राणा काम पाहत होता. या गाण्याचा आणि कथित ड्रग्ज पेडलरचा काय संबंध आहे, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मलिक यांनी यासंदर्भात दोन ट्विट केले असून, त्यामध्ये राणाचा फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटो आहे.