स्विटोलिना, क्रेसिकोव्हा स्पर्धेबाहेर, कार्लोस अल्काराझची माघार
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
जागतिक द्वितीय मानांकित डॅनील मेदवेदेव्ह, फेलिक्स ऑगर ऍलियासिमे, लेलाह फर्नांडेझ व एरीना साबालेन्का यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली तर एलिना स्विटोलिना, बार्बेरा क्रेसिकोव्हा यांचे आव्हान संपुष्टात आले. स्पेनच्या कार्लोस अल्काराझने माघार घेतल्याने फेलिक्सला पुढच्या फेरीत स्थान मिळाले.
रशियाच्या मेदवेदेव्हने हॉलंडच्या बोटिक व्हान डी झांडशुल्पची घोडदौड 6-3, 6-0, 4-6, 7-5 अशी रोखत सलग तिसऱयांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. विशेष म्हणजे या स्पर्धेत पहिल्यांदाच त्याने एक सेट गमविला. तिसऱया सेटमध्ये 20 शॉट्सची रॅली बोटिकने जिंकली आणि नंतर हा सेटही जिंकला. येथे आल्यापासून मेदवेदेव्हमध्ये पहिल्यांदाच थकव्याची लक्षणे दिसून आली. शेवटच्या सेटमध्येही बोटिकने चांगला संघर्ष केला. पण मेदवेदेव्हने अखेर बाजी मारली. बोटिकने आधीच्या फेरीत अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला हरविले होते. मागील वर्षी मेदवेदेव्हला उपांत्य फेरीत डॉमिनिक थिएमकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळीही त्याला जोकोविचशी मुकाबला करावा लागण्याची शक्यता आहे.
कार्लोसची माघार
स्पेनचा युवा खेळाडू 18 वर्षीय कार्लोस अल्काराझने दुसऱया सेटमधून अनपेक्षित माघार घेतल्याने फेलिक्स ऑगर ऍलियासिमेला शेवटच्या चारमध्ये स्थान मिळाले. पहिला सेट फेलिक्सने 6-3 असा घेतला होता आणि दुसऱया सेटमध्ये तो 3-1 असे आघाडीवर होता. कार्लोस सर्व्हिस करण्याच्या तयारीत असताना त्याने अचानक आपण पुढे खेळू शकणार नसल्याचे सांगितले. नेमके काय झाले, हे मलाही सांगता येत नाही. पण मी खेळू शकणार नाही, एवढे लक्षात आले, असे त्याने सांगितले. आधीच्या फेरीत त्याला पाच सेट्सचे दोन सामने खेळावे लागल्याने त्याला थकवा आला असण्याची शक्यता आहे. फेलिक्सविरुद्ध खेळण्यासाठी तो मैदानात उतरला तेव्हा त्याच्या दोन्ही पायांना स्ट्रपिंग केलेले दिसून आले. पण त्याच्या खेळात आधीचा जोश व जोम आढळून आला नाही.
फर्नांडेझची स्वप्नवत घोडदौड कायम
महिला एकेरीत कॅनडाची टीनेजर लेलाह फर्नांडेझने स्वप्नवत घोडदौड कायम राखताना युपेनच्या पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाला पराभवाचा धक्का देत ग्रँडस्लॅमची पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे. तिने स्विटोलिनावर 6-3, 3-6, 7-6 (7-5) अशी संघर्षपूर्ण मात केली. तसा हा धक्कादायक पराभव म्हणता येणार नाही. कारण याआधी फर्नांडेझने तिसऱया फेरीत नाओमी ओसाका व चौथ्या फेरीत अँजेलिक केर्बर या बहुग्रँडस्लॅम विजेत्यांना पराभवाचे धक्के दिले आहेत. स्विटोलिनाविरुद्ध तिसऱया सेटमध्ये टायब्रेकरपर्यंत तिला संघर्ष करावा लागला. अतिशय चुरशीचा झालेला हा सेट 7-5 असा जिंकून तिने शेवटच्या चारमध्ये प्रवेश मिळविला. जागतिक क्रमवारीत 73 व्या स्थानावर असणाऱया 19 वर्षीय फर्नांडेझविरुद्ध विजय मिळवित उपांत्य फेरी गाठण्याची संधी असल्याचे स्विटोलिनाला वाटले होते. पण फर्नांडेझने पुन्हा एकदा आपली कुवत दाखवून देत तिचे आव्हान संपुष्टात आणले.
साबालेन्का पहिल्यांदाच उपांत्य फेरीत
जागतिक द्वितीय मानांकित बेलारुसच्या एरीना साबालेन्काने क्रेसिकोव्हाचा 6-1, 6-4 असा धुव्वा उडवत या स्पर्धेची पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. पहिल्या गेममध्ये तिने तीनदा डबलफॉल्ट केले तरीही तिने सर्व्हिस राखण्यात यश मिळविले. सुमारे दीड तासाच्या खेळात तिने क्रेसिकोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले. क्रेसिकोव्हाने याआधी प्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. पण येथे तिला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. साबालेन्काला यापूर्वी पाचवेळा या स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्यात अपयश आले होते, यावेळी पहिल्यांदाच ती मुख्य स्पर्धेत खेळत आहे.